Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीच्या सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप खोटा - पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 14:50 IST2019-03-25T14:46:55+5:302019-03-25T14:50:51+5:30
धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर परवानगी नाकारल्याचा केलेला आरोप खोटा ठरल्याचे समोर आले आहे.

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीच्या सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप खोटा - पोलीस अधीक्षक
बीड : राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, असा आरोप जर कोणी करीत असेल तर तो खोटा आहे. आलेल्या अर्जांप्रमाणे आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीला परवानगी दिलेली आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर परवानगी नाकारल्याचा केलेला आरोप खोटा ठरल्याचे समोर आले आहे.
बीडमध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहे. सोमवारी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे आणि भाजपकडून डॉ.प्रीतम मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बीडमध्ये दोन्ही पक्षाच्यावतीने रॅलीही काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी सोमवारी सकाळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सोमवारी घेण्यात येणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप केला. शिवाय पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यावरही वैयक्तीक टिका केली.
या आरोपाला उत्तर देताना पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले, राष्ट्रवादीने १९ मार्च रोजी सभेसाठी अर्ज केला. महिला महाविद्यालयासमोरील बागलाने इस्टेटची जागा त्यात निश्चीत केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांना शिवाजीनगर पोलीस निरीक्षकांनी परवानगी दिलेली आहे. भाजपने २३ मार्च रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरात सभा घेण्यासाठी अर्ज केला. त्याप्रमाणे त्यांनाही परवानगी दिलेली असल्याचे जी.श्रीधर म्हणाले.
कोणाला कशी दिली परवानगी
राष्ट्रवादीचा १९ मार्च रोजी अर्ज आला. त्यांना रॅलीसाठी सकाळी १० ते २ आणि सभेसाठी २ ते ५ अशी वेळ निश्चीत करून दिली. तर भाजपचा २३ मार्च रोजी अर्ज आला. त्यांना रॅलीसाठी दुपारी ३ ते ५ आणि सभेसाठी सायंकाळी ६.३० ते ९.३० अशी वेळ ठरवून देण्यात आलेली आहे.
ऐनवेळी जागा बदलण्याचा घाट
राष्ट्रवादीने पहिल्या अर्जात बागलाने इस्टेट हे सभा स्थळ निश्चीत केले होते. त्यानंतर भाजपचा अर्ज आला. त्यांनी माने कॉम्प्लेक्स ही जागा ठरविली. परंतु शनिवारी दुपारनंतर राष्ट्रवादीने जागा बदलून माने कॉम्प्लेक्सच पाहिजे असा घाट घातला. मात्र आगोदरच भाजपला परवागनी दिली असल्याने पोलिसांनी जागा बदलण्यास नकार दिल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.