रिॲलिटी चेक
बीड : जिल्हा रुग्णालयासारख्या मोठ्या संस्थेत नियोजनासाठी डझनभर अधिकारी असतानाही सामान्यांना हाल सहन करावे लागतात. परंतु, वडवणीसारख्या छोट्याशा आरोग्य केंद्रातील काम मात्र कौतुकास्पद दिसले. जीव छोटा असला तरी येथील टापटीपपणा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि लसीकरणासाठी केलेले नियोजन समाधानकारक होते. जीव छोटा असला तरी मोठ्या संस्थेला लाजवेल असे काम येथे बुधवारी दिसून आले.
वडवणी हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु, येथे ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या तालुक्यात चिंचवण येथे ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु, तालुक्याचे ठिकाण असल्याने आरोग्य केंद्रातच सर्व सुविधा दिल्या जातात. सध्या येथे कोरोना लसीकरण आणि व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. हाच धागा पकडून 'लोकमत' टीमने बुधवारी दुपारी आरोग्य केंद्राला भेट दिली. यात लसीकरणासाठी आलेल्यांची नोंदणी केली जात होती. तसेच एका एएनएमकडून लाभार्थ्यांना लस दिली जात होती. तर दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात होती. कोणाचेही हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्यासह लसीकरणानंतर निरीक्षण करता यावे, यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केल्याचे दिसले. विशेष म्हणजे डॉक्टर, कर्मचारीही उपस्थित होते. एकूण परिस्थिती पाहता, इतर संस्थांना लाजवेल, असे काम येथे पहावयास मिळाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.घुबडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे, आरोग्य सहाय्यक मधुकर साळवे, एम. जी. नागरे, आरोग्यसेविका कल्याणी दरवई, एलचव्ही अनुराधा जायभाये आदी कर्मचारी याठिकाणी कर्तव्य बजावताना दिसले.
एडीएचओ, नोडल ऑफिसरची सरप्राईज व्हिजीट
कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ. एल. आर. तांदळे यांनी बुधवारी दुपारी आरोग्य केंद्राला सरप्राईज व्हिजीट दिली. यात लसीकरणाचा आढावा घेण्यासह वेबसाईट व कोवीन ॲपबद्दल माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांना सूचना करून लस ठेवलेल्या केंद्राची तपासणी केली.
चाचणी व लसीकरणात वेगळेपण हवे
या ठिकाणी अपुरी जागा असल्याने कोरोना चाचणी आणि लसीकरण करणारे लोक एकाच दरवाजातून येतात. दुर्दैवाने एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तर संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोरोना चाचणीची व्यवस्था स्वतंत्र करण्याची गरज आहे. डॉ. घुबडे यांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
===Photopath===
030321\032_bed_19_03032021_14.jpeg~030321\032_bed_18_03032021_14.jpeg
===Caption===
लसीकरण नेांदणीबाबत ऑनलाईन अडचणींबाबत सुचना करताना नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम. सोबत डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.बाळासाहेब तांदळै आदी.~कोरोना लस ठेवलेल्या ठिकाणाची तपासणी करताना अधिकारी...