बीड-अहिल्यानगर महामार्गावर बिबट्याचा पुन्हा बिनधास्त संचार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:55 IST2025-11-20T11:49:07+5:302025-11-20T11:55:22+5:30
'रस्त्याचा राजा' शिकारीसाठी बाहेर; 'शिकारी' साठी रस्त्यावर येणाऱ्या बिबट्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बीड-अहिल्यानगर महामार्गावर बिबट्याचा पुन्हा बिनधास्त संचार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
- नितीन कांबळे
कडा (बीड): "रात्री-अपरात्री प्रवास करताना जीव मुठीत धरा!" बीड आणि अहिल्यानगर राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आष्टी वनपरिक्षेत्र हद्दीत बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे आता ते शेत आणि लोकवस्तीसह थेट महामार्गावर येत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान कानिफनाथ घाटात बिबट्या पुन्हा एकदा प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे!
महिनाभरात दुसऱ्यांदा दर्शन
काही दिवसांपूर्वी १५ ऑक्टोबर रोजी याच घाटात बिबट्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता अवघ्या महिनाभरात १९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबटे हे निशाचर (रात्री सक्रिय) प्राणी आहेत. डोंगरपट्यात त्यांचा नैसर्गिक अधिवास असला तरी, शिकारीसाठी ते लोकवस्तीकडे धाव घेतात. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, वासरे आणि श्वानांचा फडशा त्यांनी पाडला आहे. आता रस्त्यावर त्यांचा बिनधास्त संचार सुरू असल्याने प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
'माणसाचा जीव गेल्यानंतर मदत काय कामाची?'
बिबट्यांचा उपद्रव वाढूनही वनविभाग कोणतीच ठोस उपाययोजना करत नसल्याबद्दल समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परमेश्वर घोडके यांनी थेट सवाल केला आहे, "वनविभाग केवळ शेळ्या, वासरे यांचा फडशा पाडल्यावर पंचनामा करून नुकसान भरपाई देते. पण ही नुकसान भरपाई देण्याऐवजी त्या बिबट्याचा बंदोबस्त करायला हवा. आज प्राण्यांचा जीव जातोय, उद्या माणसाचा जीव गेल्यानंतर तुमची मदत काय कामाची? अनेक वेळा मागणी करूनही वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नाहीये." बिबट्यांचा बिनधास्त वावर पाहता, वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.