अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 19:24 IST2022-10-19T19:23:34+5:302022-10-19T19:24:09+5:30
नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसन सभेचा दिंद्रुड येथे रास्तारोको

अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
दिंद्रुड (बीड): मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे दिंद्रुड महसूल मंडळात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम व सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दिंद्रुड महसूल मंडळातील सोयाबीन, कापूस, तूर यासह सर्व खरीप पिके संपूर्णपणे उध्वस्त झाली आहे. हातात तोंडाशी आलेल्या घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दिंद्रुड येथे आज सकाळी तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरसकट मदत जाहीर करावी, दिंद्रुड महसूल मंडळाचा 25 % अग्रीम मध्ये तात्काळ समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात सुहास प्रकाश झोडगे, युवा नेते हनुमान फपाळ, बाबा फपाळ, विजय झोडगे, विलास लाटे, नवनाथ धुमाळ, अर्जुन दादा पवार, राज झोडगे यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता.
सरसकट मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर
दरम्यान, शासनाकडे सरसकट मदत जाहीर करावी असा अहवाल सादर केला आहे. तसेच दिंद्रुड महसूल मंडळाचा 25% अग्रीममध्ये समावेश करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी मंडळ अधिकारी जनार्धन भगत यांनी आंदोलकांकडून निवेदन घेताना सांगितले. यावेळी मंडळ अधिकारी अमोल सवाईश्याम, तलाठी भारत भट्टे उपस्थित होते.