कर्नाटक परिवहन मंडळाला दणका;अपघात बळीची भरपाई देण्यास टोलवाटोलवी, बीडमध्ये बस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:01 IST2022-05-04T19:01:17+5:302022-05-04T19:01:34+5:30
बीड जिल्हा न्यायालयाचा कर्नाटक परिवहन मंडळाला दणका

कर्नाटक परिवहन मंडळाला दणका;अपघात बळीची भरपाई देण्यास टोलवाटोलवी, बीडमध्ये बस जप्त
बीड : कर्नाटकच्या भरधाव बसने शहरात एका उच्चशिक्षित तरुणाच्या दुचाकीला धडक दिली होती, यात त्याचा मृत्यू झाला होता. नुकसान भरपाईपोटी कुटुंबास ४० लाख रुपये द्यावेत,असे आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिले. मात्र, कर्नाटक परिवहन महामंडळाने भरपाई देण्यास टोलवाटोलवी केली. अखेर २ मे रोजी येथील बसस्थानकातून प्रवासी घेऊन आलेली कर्नाटकची बस जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरुन जप्त करून न्यायालयात आणली.
गणेश गोविंदराव भताने (३३) हे ओडिशा येेथे गुप्तहेर विभागात नोकरीला होते. राजीनामा देऊन त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. १० जून २०१७ रोजी शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात ते सुभाष रोड हून बसस्थानकाकडे जात होते,यावेळी औरंगाबादहून सुसाट आलेल्या कर्नाटकच्या बसने पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी हाेऊन गणेश भताने मृत्यूमुखी पडले. दरम्यान,मयत गणेश यांचे वडील गोविंदराव भताने यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाविरुद्ध बीड न्यायालयात मोटार अपघात दावा क्र. १७५ /२०१९ दाखल केला. २५ जुलै २०१९ रोजी तत्कालीन जिल्हा न्या. सानिका जोशी यांनी दावा मंजूर करून गोविंदराव भताने यांना नुकसान भरपाई म्हणून ४० लाख ६२ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. मात्र, कर्नाटक परिवहन महामंडळाने न्यायालयीन आदेशाचे पालन केले नाही.गोविंदराव भताने यांचे वकील प्रवीण राख यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर जिल्हा न्या. पाचवे एस. टी. डाेके यांनी कर्नाटकच्या दोन बस जप्त करण्याचे आदेश दिले.
विनंतीवर बस सोडली पण....
जप्ती वॉरंट जारी झाल्यावर ॲड. प्रवीण राख यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा केला, पण त्यांनी दाद दिली नाही. अखेर ८ एप्रिल रोजी बीडमध्ये कर्नाटकची एक बस पकडली. मात्र, तेव्हा कर्नाटक परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. त्यानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने अखेर २ मे रोजी बस जप्त केली.
प्रवाशांना केले पैसे परत
हुबळी- औरंगाबाद ही बस (केए ६३ एफ- ०१७६) २ मे रोजी सकाळी आठ वाजता आठ प्रवासी घेऊन बीडमध्ये पोहोचली. यावेळी न्यायालयातील बेलीफ यांनी चालक के. पी.चव्हाण, केज पुजार, वाहक उमेश राठोड यांना जप्ती वॉरंट दाखवून बस ताब्यात घेतली. वाहक उमेश राठोड यांनी प्रवाशांना पैसे परत केले.