केजमध्ये पोलिसांकडून ४३ लाखांचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:59 IST2019-02-25T18:54:15+5:302019-02-25T18:59:49+5:30
सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडला होता साठा

केजमध्ये पोलिसांकडून ४३ लाखांचा गुटखा नष्ट
केज (बीड) : सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडलेला ४३ लाख ६८ हजार २० रुपयांचा गुटखा सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार केजमध्ये नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
केजचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी परराज्यातून एका टेम्पोमध्ये आणलेला २६ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा गुटखा पकडला होता. तसेच पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ आॅगस्ट २०१८ रोजी केज येथे १५ लाख पाच हजार ५२० रुपायांचा गुटखा, अमर आत्माराम काळे यांच्या घरातून एक लाख ९ हजार ८६० रुपयांचा तर चांद पाशा खुरेशी यांच्या घरातून ५६ हजार ९६० रुपयांचा गुटखा पकडला होता. सदर गुटख्याचे पोते सील करून ठेवण्यात आले होते. सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व गुटखा केज शहराजवळील गायरानात नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, केजचे सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, फौजदार बाबासाहेब डोंगरे, फौजदार विलास जाधव व पोलीस कर्मचारी आदींची उपस्थित होती.