जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:37 IST2025-02-22T16:36:38+5:302025-02-22T16:37:39+5:30
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग इथं मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पोलिस तपासाबाबत देशमुख कुटुंबासह मस्साजोगचे ग्रामस्थ असमाधानी असल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
सुरेश धस म्हणाले की, "सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी निवदेनात म्हटलं आहे. वाल्मीक कराडला चहा कोण आणून देतंय, जेवण कोण आणून देतंय, जेवण कसं आणून दिलं जातंय, काही लोकांना तर मटणही आणून दिलं जातंय आणि याबाबतचे पुरावे आहेत. कोठडीत असताना आरोपीला मोठी बॅग पोहोचवण्यात येत आहे. एकंदरीत आरोपीला व्हीआयपी सवलती दिल्या जात आहेत. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे," असा दावा धस यांनी केला.
दरम्यान, "जे कर्मचारी आरोपींना मदत करत आहेत, ते सर्व कर्मचारी निलंबित करण्यात यावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ती मागणीही मी माझ्या लेटरपॅडवर प्रशासनाकडे देणार आहे," अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे.
मस्साजोग ग्रामस्थांनी काय मागण्या केल्या?
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रशासनासमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगचे ग्रामस्थ २५ फेब्रुवारीपासून उपोषण करण्यावर ठाम आहेत. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करा. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा. अॅड. उज्ज्वल निकम यांची याप्रकरणी नियुक्ती करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. सर्व आरोपी व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सीडीआर काढून दोषी आढळणाराला सहआरोपी करावे यासह इतर मागण्यांवर ग्रामस्थ ठाम आहेत.