सरपंच देशमुख हत्या व खंडणी प्रकरणी तपासाला गती; कराडची चौकशी, सुदर्शन घुलेसह तिघे ‘वाँटेड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 06:58 IST2025-01-03T06:56:41+5:302025-01-03T06:58:23+5:30
सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली.

सरपंच देशमुख हत्या व खंडणी प्रकरणी तपासाला गती; कराडची चौकशी, सुदर्शन घुलेसह तिघे ‘वाँटेड’
बीड : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले, तर इकडे बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. त्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे.
सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली.
धनंजय देशमुख यांना संरक्षण
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एक पोलिस कर्मचारी संरक्षणासाठी दिला आहे. मी केजला शासकीय विश्रामगृह येथे एसआयटी पथक येणार असल्याने गुरुवारी गेलो होतो. परंतु अधिकारी आले नव्हते. म्हणून मी मस्साजोगला आलो, असे धनंजय यांनी सांगितले.
फरार आरोपींच्या नातेवाइकांची चौकशी : उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे सायंकाळी साडेसहा वाजता केज विश्रामगृहाबाहेर पडले. त्यांनी दिवसभरात फरार आरोपींच्या नातेवाइकांची चौकशी केल्याची माहिती आहे. तेली निघून गेल्यानंतर विश्रामगृहातून दोन पुरुष व पाच महिला, दोन लहान मुले बाहेर पडले. हे सर्व आरोपींचे नातेवाईक आहेत.
निकम यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
आमदार धस यांनी निवेदन दिल्यानंतर मी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांच्याकडे असलेल्या इतर प्रकरणांचा आढावा घेऊन दोन दिवसांत निर्णय कळवतो, असे त्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आरोपीचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा
खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वाँटेड म्हणून घोषित केले आहे. बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही दिला आहे.
योगायोग; कराड अन् पलंग सोबतच
वाल्मीक कराड याला बीड शहर पाेलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी काही तासाने पाच पलंगही आणले. त्यातील चार पलंग हे बाहेर परिसरात तर एक पलंग हा ठाण्यात नेला. हा पलंग कराड याच्यासाठीच आणला, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, गुरुवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याचा खुलासा करत हे पलंग कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचे सांगितले.
बीपी अन् शुगरच्या गोळ्या दिल्या
कराड याला बीपी अन् शुगरचा त्रास आहे. पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला आता कोठडीतच गोळ्या पुरवल्या जात आहेत. गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही.
‘एसआयटीतील चार अधिकाऱ्यांना हटवा’
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील खटल्याच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १० पोलिस अधिकाऱ्यांच्या एसआयटीतील चार अधिकाऱ्यांवर आमचा आणि संतोष देशमुख कुटुंबाचा संशय असून, त्यांना एसआयटीतून हटवावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आरोपींना बीडऐवजी छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक जेलमध्ये हलवावे, अशी मागणीही केली. धस यांनी गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या संदर्भातील निवेदन दिले.