धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाइनसाठी तपासणी करा; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:51 IST2025-02-25T12:48:19+5:302025-02-25T12:51:55+5:30
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी असून, त्यासाठी ४८५७ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे.

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाइनसाठी तपासणी करा; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आदेश
बीड : धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगररेल्वे लाइनसाठी तपासणी करण्याचा आदेश केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संचालकांना नुकताच दिला आहे. हा मार्ग लवकर प्रस्तावित झाला तर या रेल्वेमार्गास चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी असून, त्यासाठी ४८५७ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे. मराठवाडा प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि व्यापार आणि उद्योगासाठी नवीन मार्ग उघडण्यासाठी हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त, प्रस्तावित प्रकल्पाचा उणे २.४७ टक्केच्या परतावा दराने (आरओआर) आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे नेटवर्कसाठी व्यवहार्य आणि फायदेशीर गुंतवणूक सुनिश्चित होईल.
या प्रकल्पात राज्य सरकारसोबत खर्च वाटप मॉडेलचाही समावेश आहे. या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, सदरील रेल्वेमार्गाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची मंजुरी आणि काम सुरू करण्यास प्राधान्य देणे, प्रकल्प अंमलबजावणीत आणखी विलंब होऊ नये म्हणून मंजुरी प्रक्रिया जलद करणे, अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये समन्वय साधणे यासाठी बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. हा रेल्वेमार्ग एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. त्यामुळे या प्रदेशात आर्थिक समृद्धी येईल आणि सदरील मार्गावरील रहिवाशांचे जीवनमान सुधारेल, अशी आशा लोकप्रतिनिधींना आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाइनसाठीची तपासणी करावी, अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी केली होती.