५०० मीटर फरफटत नेलेल्या 'त्या' तरुणाची मृत्यूशी झुंज संपली; १९ दिवसांनंतर प्राणज्योत मालवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:22 IST2026-01-15T16:21:35+5:302026-01-15T16:22:37+5:30
गरीब कुटुंबावर कोसळली दुःखाची कुऱ्हाड

५०० मीटर फरफटत नेलेल्या 'त्या' तरुणाची मृत्यूशी झुंज संपली; १९ दिवसांनंतर प्राणज्योत मालवली
-नितीन कांबळे
कडा (जि. बीड): आई-वडिलांचा एकुलता एक आधार आणि दोन बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या २० वर्षीय आदित्य शहाजी पानखडे याची मृत्यूशी सुरू असलेली १९ दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. २८ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा गुरुवारी पहाटे अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताचा 'तो' भीषण थरार
२८ डिसेंबर रोजी दुपारी आदित्य पानखडे आपली दुचाकी घेऊन कडा येथील आठवडी बाजारासाठी जात होता. यावेळी कड्याकडून धामणगावकडे जाणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने (क्र. MH 23, BC 3737) आदित्यच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकीने आदित्यच्या दुचाकीला सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. या भीषण अपघातात आदित्यच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाली होती.
गरीब कुटुंबावर कोसळली दुःखाची कुऱ्हाड
अपघातानंतर आदित्यला तातडीने अहिल्यानगर (अहमदनगर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या पानखडे कुटुंबाने आदित्यला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, गेल्या १९ दिवसांपासून आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या आदित्यने गुरुवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. आदित्य हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा जाण्याने देवीनिमगावमधील प्रत्येक डोळा आज पाणावला आहे.