बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:01 IST2025-02-10T13:00:11+5:302025-02-10T13:01:26+5:30
मराठवाड्यासाठी महत्वाचे! धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?
बीड : अहिल्यानगर-बीडपर्यंतरेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाची केंद्र शासनस्तरावरून पडताळणी हाेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदरील रेल्वे कामासाठी ४,८५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा मार्ग २४० किमी आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय कधी निर्णय घेईल याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर-जळगाव या रेल्वेलाइनसाठी तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, पैठण, घृणेश्वर, सिल्लोड व अजिंठा या मार्गाचा सर्व्हे केला जाईल, असे २००८-०९ मध्ये जाहीर करण्यात आले होते; परंतु पुढे हे सर्व्हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यानंतर २०१७ मध्ये मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने सदरील सर्व्हे तत्काळ करावा, अशी मागणी केली होती. हा मार्ग बदलण्यात येत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात तेव्हा करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेकडून दोन भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या भागात उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन लाइन प्रोजेक्ट आरईसीटी सर्व्हे २०१८-१९ मध्ये मंजूर करून त्यानुसार २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला सर्व्हेक्षण रिपोर्ट पाठिवला होता. तर दुसऱ्या भागात सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते.
तर बीडचा होणार औद्यागिक विकास
बीडमध्ये इंडस्ट्रिअल एरिया नाही म्हणून विकास खुंटलेला आहे. परंतु आता अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यात रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इतर एक्सप्रेस रेल्वे बीडशी जोडल्या जातील. रेल्वे बीडमध्ये येणार असल्याने मालवाहतुक सोपी होईल. त्यातच आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्गाचा सर्व्हे आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे हा मार्ग झाला तर बीड शहर हे रेल्वेसाठी मध्यवर्ती ठिकाणी होईल. वाहतूक सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या कंपन्या बीडमध्ये येतील परिणामी बीडचा विकास झपाट्याने होईल असे अपेक्षित आहे.
वाहतुकीवर खुप काही निर्भर
ट्रक किंवा इतर वाहनांच्या मदतीने इतर जिल्ह्यातील किरणा, लोखंड, स्टील, खते यासह इतर माल बीडमध्ये पोहोचतो. वाहनाद्वारे होणारे वाहतुक खर्चिक असते. परंतु रेल्वेद्वारे माल वाहतूक कमी खर्चिक असते. शिवाय कमी वेळेत देशभरात इतर ठिकाणी माल आणला-नेला जाऊ शकतो. वाहतुकीवर खुप काही निर्भर त्यामुळे वाहतूक दर कमी असल्यास माल ने-आण करण्यास आर्थिक झळ बसत नाही. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल.