अरे देवा... लग्न जुळवतो म्हणून महिनाभर पाहुणचार झोडून अडीच लाख घेऊन पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:41 IST2025-08-07T12:39:09+5:302025-08-07T12:41:35+5:30
सोने गहाण, कर्जही काढले : चार पैकी एका महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव केली होती, तर दुसऱ्या एका महिलेने बचत गटाचे कर्ज घेतले होते. या चारही महिला मजुरी करून पोट भरतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना अश्रू अनावर झाले.

अरे देवा... लग्न जुळवतो म्हणून महिनाभर पाहुणचार झोडून अडीच लाख घेऊन पोबारा
बीड : मुलांच्या लग्नासाठी मुली पाहणे सुरू असतानाच जूनमध्ये धाराशिवचे दाम्पत्य घरी आले. आम्ही २५ लग्न जुळवले असून, तुमच्या मुलांसाठीही मुलगी आहे, असे सांगून महिनाभर पाहुण्यासारखे मुक्कामी राहिले. त्यानंतर चार महिलांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन पोबारा केला. १५ दिवसांपासून त्यांचा मोबाइल बंद असल्याने अखेर या महिलांनी बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेत कैफियत मांडली. लग्नाआधीच्या खेळखंडोबाची बीडमधील ही आणखी एक नवी कहाणी समोर आली आहे.
सोने गहाण, कर्जही काढले : चार पैकी एका महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव केली होती, तर दुसऱ्या एका महिलेने बचत गटाचे कर्ज घेतले होते. या चारही महिला मजुरी करून पोट भरतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना अश्रू अनावर झाले.
उभयता अहेर करून दक्षिणाही दिली...
गेवराई शहरातील चार महिला मजुरी करून उपजीविका भागवितात. त्यांची मुलेही लग्नाला आली आहेत. वर्षभरापासून त्यांच्या लग्नासाठी मुली पाहणे सुरू होते. जून महिन्यात आलेल्या दाम्पत्याने मुलांचे लग्न जुळवून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेच्या घरी महिनाभर मुक्काम केला. त्याच महिलेला दोन मुले असल्याने तिच्याकडून आधी एक लाख रुपये घेतले.
त्यानंतर शेजारील तीन महिलांनाही असेच आमिष दाखवून प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले. लग्न जमल्याच्या आनंदात या चार महिलांनी दाम्पत्याला नवीन कपडे, साडी-चोळीचा आहेर केला. शिवाय हातावर ‘दक्षिणा’ही ठेवली होती. हे दाम्पत्य २५ जुलैपासून पसार झाले. त्यांनी दिलेला धाराशिवमधील पत्ताही खोटा असल्याचे आढळून आले.