'...तर पुन्हा भाजपात जाऊ, शिंदे गटाचाही पर्याय'; आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादीत अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 18:48 IST2023-02-13T18:48:04+5:302023-02-13T18:48:36+5:30
गरज पडल्यास शिंदे गटात देखील प्रवेश शक्य, सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय खुल्ले असल्याचा आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले

'...तर पुन्हा भाजपात जाऊ, शिंदे गटाचाही पर्याय'; आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादीत अस्वस्थ
माजलगाव ( बीड): मतदारसंघातील जनतेची इच्छा असेल तर भाजपातही जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. सत्ता बदलानंतर आ. सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील आठ महिन्यापासून सुरू आहे, यावर पत्रकार परिषदेत आ. सोळंके स्पष्टीकरण दिले. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेने राजकीय तर्कवितर्क सुरु आहेत.
माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश सोळंके हे दोन वेळा भाजपकडून तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेत पोहचले आहेत. तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा आ. सोळंके यांनी मंत्रीपदाची मागणी केली होती. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान, मागील राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आ. सोळंके हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार होत आहे. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील सुंदरराव सोळुंके महाविद्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीकडून 17 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. सोळंके बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असल्याची मला अद्याप माहिती नसून जर जनतेची इच्छा असेल तर त्यांच्याशी चर्चा करून ते करावेही लागेल. परंतु भाजपाचे काही लोक याच्या वावड्या उठवतांना दिसत आहेत.
बाळासाहेबांच्या सेनेवरही नजर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या चांगले काम सुरु असुन त्यांना बीड जिल्ह्यात मजबूत नेत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्या पक्षात देखील प्रवेश शक्य असून सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय खुल्ले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी तेलंगणा मधील केसीआर सरकारच्या चांगल्या कामाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.