रेल्वेपासून विमानतळापर्यंतचा बीडसाठीचा मास्टरप्लॅन; अजितदादांचे स्वप्न कोण पूर्ण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:02 IST2026-01-30T19:01:55+5:302026-01-30T19:02:42+5:30

अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा तयार केला होता मास्टर प्लॅन

'I will change the face of Beed...'; From railways to airports, who will fulfill Ajit's dream? | रेल्वेपासून विमानतळापर्यंतचा बीडसाठीचा मास्टरप्लॅन; अजितदादांचे स्वप्न कोण पूर्ण करणार?

रेल्वेपासून विमानतळापर्यंतचा बीडसाठीचा मास्टरप्लॅन; अजितदादांचे स्वप्न कोण पूर्ण करणार?

बीड: "मी बीडचा चेहरामोहरा बदलून टाकेन, बीडची बारामती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," हा शब्द उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रत्येक भाषणात दिला होता. केवळ घोषणाच नाही, तर रस्ते, रेल्वे, पाणी आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी विकासाचा एक ठोस 'मास्टर प्लॅन' तयार केला होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या प्रगतीची ही स्वप्ने आता अधांतरी पडली आहेत. "दादांनी पाहिलेला हा स्वप्नवत बीड आता कोण पूर्ण करणार?" असा आर्त सवाल बीडकर विचारत आहेत. दादांनी पाहिलेला हा 'विकसित बीड'चा संकल्प आता अर्ध्यावरच खुंटला आहे. शब्दाचा पक्का असलेल्या या लोकनेत्याची एक्झिट बीडच्या विकासाला मोठा धक्का देऊन गेली आहे.

रेल्वे, विमानतळाचा ध्यास
अहिल्यानगर ते बीडपर्यंत रेल्वे आली, १७ सप्टेंबरला तिचे उद्घाटनही झाले. पण बीड ते परळी हे महत्त्वाचे काम अजून बाकी आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण व्हावे, यासाठी दादांचा मोठा हट्ट होता. इतकेच नाही तर, जिल्ह्याला विमानतळ मिळावे ही घोषणाही दादांचीच होती. त्यांच्या सूचनेनुसार यंत्रणांनी सर्वेक्षण आणि पाहणी पूर्ण केली होती.

नर्सिंग कॉलेज, वसतिगृहाचाही प्लॅन
जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांची नवीन इमारत महिनाभरात सुरू होणार होती. तसेच बाजूच्या २०० खाटांच्या इमारतीचाही त्यांनी स्वतः आढावा घेतला होता. गृह विभागाची अतिरिक्त जागा घेऊन तेथे नर्सिंग कॉलेज आणि मुलींचे भव्य वसतिगृह उभारण्याचा त्यांचा मानस होता. बीडच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मजबूत करण्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला होता.

रस्ते आणि पायाभूत सुविधा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे शहरातून जाणारे काम पूर्ण करण्यासाठी दादांनी ११७ कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. बीडकरांना एक दिवसाआड पाणी मिळावे, यासाठी नवी पाणीपुरवठा योजना आणि वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी 'सोलर प्रकल्प' उभारण्याची त्यांची तयारी होती.

ठेवीदारांचा आधार अन् उद्योगांची आशा
ज्ञानराधा, जिजाऊ आणि साईराम यांसारख्या मल्टीस्टेटनी लाखो ठेवीदारांना लुबाडले होते. दादा जेव्हा बीडमध्ये यायचे, तेव्हा आवर्जून पोलिसांकडून याची बैठक घ्यायचे. बीड, माजलगाव, परळीतील सिरसाळा आदी ठिकाणी एमआयडीसी उभारून रोजगार देण्याचे स्वप्नही आता त्यांच्या निधनाने धुसर झाले आहे.

पक्ष म्हणून यांच्यावर जबाबदारी
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अजित पवार हे कुटूंबप्रमुख होते. आता त्यांच्या निधनाने बीडमधील सर्व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून परळीचे आमदार धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर असणार आहे. त्यांना महायुतीतील भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सहकार्याचीही गरज आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षात असले तरी अजित दादांशी त्यांची जवळीक होती.

Web Title: 'I will change the face of Beed...'; From railways to airports, who will fulfill Ajit's dream?