‘मी एकटा पडलो’! मित्रांनी वाढदिवसाला बोलावले नाही; व्यथित तरुणाने ‘स्टेट्स’ ठेवून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:41 IST2026-04-09T19:40:19+5:302026-04-09T19:41:16+5:30
महेशचे काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत किरकोळ वाद झाले होते.

‘मी एकटा पडलो’! मित्रांनी वाढदिवसाला बोलावले नाही; व्यथित तरुणाने ‘स्टेट्स’ ठेवून संपवलं जीवन
अंबाजोगाई : मैत्रीत झालेला दुरावा आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधून डावलले गेल्याच्या शल्यातून अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील महेश उद्धव भणगे (वय २४) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो," असे हृदयद्रावक स्टेट्स मोबाइलवर ठेवून त्याने आपली जीवनयात्रा संपवली.
महेशचे काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत किरकोळ वाद झाले होते. याच कारणातून सोमवारी एका जवळच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्याला बोलावण्यात आले नव्हते. नेहमी मित्रांच्या कामात आणि आनंदात हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या महेशला या उपेक्षेमुळे प्रचंड मानसिक वेदना झाल्या होत्या. याच नैराश्यातून मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घराच्या छतावर जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. रात्री ८ वाजेच्या सुमारास तो बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
वडिलांनी हट्ट केला होता पूर्ण
महेशच्या वडिलांनी मुलाच्या हट्टापायी आपली शेती विकून त्याला कपड्याचे दुकान टाकून दिले होते. व्यवसाय स्थिरावत असतानाच केवळ मैत्रीतील वादातून त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे भणगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.