"अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता"; वाल्मिक कराडविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:32 IST2024-12-30T14:21:26+5:302024-12-30T14:32:20+5:30
वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण करण्यात येत आहे.

"अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता"; वाल्मिक कराडविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन
Valmik Karad :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी अनेक आमदारांनी व इतर लोकप्रतिनिधिंनी लावून धरली आहे. मात्र अद्यापही वाल्मिक कराड हा फरार असून सीआडीकडून त्याचा शोध सुरु आहे. दुसरीकडे, वाल्मिक कराडवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण करण्यात येत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत.
वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे. "राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता. त्यांचा हा खरा चेहरा नाही. त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याण केले आहे. माझ्या सारखे अनेकजण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत," असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणीसाठी गुन्हा दाखल पासून वाल्मिक कराड बेपत्ता आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कराडचा कसून शोध घेतला जात आहे. अशातच कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असल्याचे समोर आलं आहे. ११ डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यानंतर त्याचा फोन बंद झाला.