संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:38 IST2025-05-05T13:37:45+5:302025-05-05T13:38:52+5:30
HSC Exam Result 2025: आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
HSC Exam Result 2025: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात हादरला होता. वडिलांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुखांची कन्या वैभवी(Vaibhavi Deshmukh), आपले चुलते धनंजय देशमुखांसोबत राज्यभर फिरत होती. तिने महाराष्ट्रभर आंदोलने केली, अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते, अशा कठीण परिस्थितीत तिने अभ्यास करुन बारावीमध्ये 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना संतोष देशमुखांची कन्या वैभवी हिने 12 वीची परीक्षा दिली होती. या कठीण परिस्थितीमध्येही बारावीच्या परीक्षेत वैभवीने घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत.
बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,968 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.