धक्कादायक ! महाराष्ट्रात १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:46 PM2019-12-06T12:46:49+5:302019-12-06T12:51:01+5:30

सुरक्षित मातृत्व अभियानात गरोदर मातांची तपासणी

'High risk' maternity of 17,000 women in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रात १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’

धक्कादायक ! महाराष्ट्रात १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’

googlenewsNext
ठळक मुद्दे१७ लाख गरोदर महिलांची तपासणी१७ हजार महिलांना प्रसूतीदरम्यान अतिजोखीम सहन करावी लागणार आहे. प्रसूती सुखद करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

- सोमनाथ खताळ

बीड : राज्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत १८११ आरोग्य संस्थांमध्ये खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने गरोदर महिलांची तपासणी केली जाते. तीन वर्षांत १७ लाख महिलांची तपासणी केल असून चालू वर्षात तब्बल १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’ असल्याचे दाखविण्यात आले आहे. या महिलांना प्रसूतीदरम्यान अतिजोखीम सहन करावी लागणार आहे. ही आकडेवारी आरोग्य विभागाच्या एका अहवालातून ‘लोकमत’च्या  हाती लागली आहे.

मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक सरकारी आरोग्य संस्थेत खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे राज्यात हे अभियान सुरू करण्यात आले. मागील तीन वर्षांत राज्यात १८११ आरोग्य संस्थांमध्ये तब्बल १६ लाख ८९ हजार ७८० महिलांची तपासणी करण्यात आली.४ लाख ५७ हजार ३५५ महिलांची सोनोग्राफी केली असता हिमोग्लोबीन, डायबीटीज, हायपरटेंशन, रक्तशय अशा आजार असलेल्या महिलांची संख्या ७२ हजार ३२० एवढी असून २०१९-२० मध्ये १७ हजार ४४३ एवढा आकडा आहे. यांची प्रसुती ‘हाय रिस्क’ संबोधली गेली असून त्यांची प्रसूती सुखद करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

देशात महाराष्ट्र टॉपवर
हे अभियान देशात राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्राने ८२० गुणे मिळवून पहिले स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकाचा क्रमांक लागतो. 

मराठवाड्यात बीड अव्वल
आरोग्य संस्थांच्या संख्येत बीड जिल्ह्यातील ६५ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात ११ व्या तर मराठवाड्यात अव्वल स्थानी बीड आरोग्य विभाग आहे. मुंबईत सर्वाधिक १५३ आरोग्य संस्थांमध्ये हे अभियान राबविले जात आहे.

बीडमध्ये सर्वाधिक खाजगी डॉक्टरांची मदत
राज्यात सर्वाधिक स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत बीड जिल्ह्यात आहे. तब्बल १०६ स्त्रीरोगतज्ज्ञ कसलाही मोबदला न घेता महिन्याच्या ९ तारखेला शासकीय संस्थेत जाऊन उपचार करतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीडने पहिले स्थान पटकावले आहे.

गरोदर मातांना दर्जेदार व तात्काळ उपचार 
बीडमध्ये १०६ खाजगी स्त्री रोगतज्ज्ञ मदत करीत आहेत. हायरिस्क असलेल्या मातांची नियमित तपासणी करून मार्गदर्शन केले जाते. या अभियानामुळे गरोदर मातांना दर्जेदार व तात्काळ उपचार मिळत आहेत.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

 एक नजर आकडेवारीवर (गरोदर माता)
वर्ष     तपासणी     हायरिस्क    सोनोग्रॉफी
२०१७-१८    ८२४३०९        ३०८०५    १८१८९४
२०१८-१९    ७०३०५७        २४०७२    २२२१४१    
२०१९-२०    १६२४१४        १७४४३    ५३३२०

Web Title: 'High risk' maternity of 17,000 women in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.