बाळाला जन्म देऊनही पाहता येत नव्हते, डॉक्टरांनी 'दृष्टिदान' दिल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:03 IST2025-09-13T13:02:51+5:302025-09-13T13:03:49+5:30

सतत धुराच्या संपर्कात आल्यामुळे गेली होती दृष्टी; अंबाजोगाईच्या डॉक्टरांनी 'दृष्टिदान' दिले, मुलाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

Heartwarming! Mother unable to see her baby even after birth, but the doctor gave him 'vision' and tears of joy filled the mother's eyes | बाळाला जन्म देऊनही पाहता येत नव्हते, डॉक्टरांनी 'दृष्टिदान' दिल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

बाळाला जन्म देऊनही पाहता येत नव्हते, डॉक्टरांनी 'दृष्टिदान' दिल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

अंबाजोगाई : कळंब (जि. धाराशिव) तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील २६ वर्षीय महिलेला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी 'दृष्टिदान' देऊन तिच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला आहे. दीड महिन्यापूर्वी बाळाला जन्म देऊनही दृष्टी नसल्याने ती आपल्या मुलाला पाहू शकली नव्हती.

शेंगदाणे आणि फुटाणे भाजण्याचे काम करीत असल्यामुळे ही महिला सतत धुराच्या संपर्कात येत होती. यामुळे तिला 'प्रिसनाइल मोतीबिंदू' हा दुर्धर आजार झाला आणि तिची दृष्टी पूर्णपणे गेली. उपचारासाठी पैसे नसल्याने ती अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात आली. येथे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला; पण जन्मानंतरही ती आपल्या बाळाला पाहू शकली नाही. तिची ही अवस्था पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी तात्काळ नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे यांना माहिती दिली. डॉ. दराडे यांनी महिलेची तपासणी करून तिला प्रिसनाइल मोतीबिंदू झाल्याचे निदान केले. प्रसूती सिझेरियन असल्याने डॉक्टरांनी एक महिन्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, बुधवार आणि गुरुवारी डॉ. ज्ञानोबा दराडे आणि डॉ. एकनाथ शेळके यांनी तिच्या दोन्ही डोळ्यांवर अत्यंत गुंतागुंतीची आणि तातडीची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

आनंद अवर्णनीय होता
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर डॉक्टरांनी महिलेचे बाळ तिच्या हातात दिले. आपल्या डोळ्यांनी पहिल्यांदा बाळाला पाहताच त्या मातेला झालेला आनंद अवर्णनीय होता. हा अविस्मरणीय क्षण पाहून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार आणि नेत्र विभागातील संपूर्ण टीमच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. "हा आमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे," असे डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या 'दृष्टिदाना'मुळे एका आईला तिच्या मुलाचे रूप पाहता आले आहे.

Web Title: Heartwarming! Mother unable to see her baby even after birth, but the doctor gave him 'vision' and tears of joy filled the mother's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.