ह्रदयद्रावक... दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:32 IST2022-12-24T13:32:04+5:302022-12-24T13:32:32+5:30
पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी येथील घटना

ह्रदयद्रावक... दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू
नितीन कांबळे
कडा (बीड) - दोन महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला भेटण्यासाठी गावी येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक वळणावर दुचाकीचा ताबा सुटुन झालेल्या अपघातात पित्याचा जागीच मुत्यु झाद्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असल्याने मुलाची भेट आधुरीच राहिल्याचे दिसुन आले.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील युवराज पोपट जगताप वय वर्ष ३४ हा गेल्या अनेक वर्षांपासून शेवगांव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करायचा त्यामुळे कुटुंबासह कारखान्यावर राहत होता. पत्नीला दिवस गेल्याने ती माहेरी गेली होती. बाळंत झाल्यानंतर माहेरहून ती सासरी आल्यावर वडिल आपल्या दोन महिन्याच्या तान्हुल्याला भेटण्यासाठी शुक्रवारी गावाकडे येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक एका वळणावर दुचाकी क्रमांक एम.एच १२, डी.के.३५६६ वरील ताबा सुटुन पुलाच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मुत्यु झाल्याची घटना रात्री ९ च्या दरम्यान घडली. मृतावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन अंत्यविधी दुपारच्या दरम्यान होईल.त्याच्या पाश्यात आई, वडिल, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.