बीड: शिरूरकासार तालुक्यातील वडाचीवाडी येथील एका तरुणाची पुणे येथील एका व्यक्तीने शेततलावाच्या दुरुस्तीचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत नवनाथ खेडकर (वय ३६, रा. वडाचीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुणे येथील धनंजय दिनकर धसे याने २०१६ मध्ये त्यांच्या गावात शेततलावाचे काम केले होते. याच ओळखीतून धसे यांनी खेडकर यांना ५० लाख रुपयांचे शेततलावाचे काम पार्टनरशिपमध्ये देण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी १५ लाख रुपये गुंतवल्यास १० लाख रुपये नफा होईल, असे सांगितले. धसे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खेडकर यांनी वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे १३ लाख ५० हजार रुपये दिले. यात पहिल्यांदा रोख ५ लाख, नंतर २ लाख तसेच धसे यांच्या मुलाच्या खात्यावर आणि इतर व्यक्तींनाही पैसे दिले. मात्र, पैसे दिल्यानंतर धसे यांनी कामाबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी फोन घेणे बंद केले आणि पैशांची मागणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या खेडकर यांनी सुरुवातीला तक्रार केली नाही, परंतु आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी धनंजय दिनकर धसे (रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मुलाचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
राजकीय नेत्यांसोबत उठबसधनंजय धसे हा जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. परंतु त्याची मंत्री, आमदार, खासदार यांच्यासोबत उठबस असते. तो बाहेर समाजात फिरताना नेत्यांचा पीए असल्याचे सांगत असतो. विशेष म्हणजे अनेक प्रशासकीय बैठकांमध्येही तो हजर असतो. त्याने जिल्हा परिषदेत कधीच काम केले नसल्याचेही आता समोर आले आहे. परंतु राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याने त्याच्याविरोधात कोणीही कारवाई केली नाही. परंतु आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने धनंजय धसे याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.