मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:20 IST2022-03-28T13:18:16+5:302022-03-28T13:20:06+5:30
मित्राच्या वरातीत बेधुंद नाचलेल्या तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड): मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यानंतर तरुणाचा हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडली. वैभव रामभाऊ राऊत ( २५ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी शिंदेवाडी या गावात माने-कोळसे शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात नवरा नवरी दोघेही शिंदे वाडी गावातील रहिवासी होते. लग्नातील नवरदेव अक्षय माने याच्या विवाह असल्याने त्याचे माजलगाव येथील मित्र लग्नास आले होते, त्यात वैभव रामभाऊ राऊत हा देखील होता. सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या वाद्यांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती. अगोदरच दिवसभर असलेला उन्हाचा पारा व त्यातच बेधुंद नाचणे बराच वेळ सुरू होते.
मिरवणूक लग्नस्थळी येताच तेथे वैभव मित्रांसह खुर्चीवर बसला. तेथे बसून त्याने तहान लागल्याने घटाघट पाणी पिले. त्यानंतर लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने तो कोसळला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मित्रांनी वैभवला लागलीच माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.