'पिकांचा पंचनामा करा'; आडसमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:31 IST2019-08-31T19:28:50+5:302019-08-31T19:31:07+5:30
आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

'पिकांचा पंचनामा करा'; आडसमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको
केज (बीड ) : तालुक्यातील आडस परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. धारूर-अंबाजोगाई रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आडस परिसरात मागील दोन वर्षांपासून पावसाने अवकृपा केली आहे. पावसाळ्याचे अर्धे दिवस होऊनही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस आहे. यामुळे खरीपाची पिके करपली आहेत.अल्प मुदतीची पिके फुलोऱ्यात व शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पूर्णपणे करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती कांहीच लागणार नाही. जवळ होते नव्हते ते पेरणीत खर्च झाल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सन-२०१७ चा खरीपाच्या पिकांचा विमा, सन-२०१८ हंगामातील तांत्रिक अडचणीमुळे न मिळालेला पिकविमा वाटत करावा, चालू हंगामात पिकविम्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबवावी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दावणीला चारा द्यावा अशा या मागण्यांसाठी शनिवारी अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार आशा वाघ यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनात बाळासाहेब देशमुख, शिवरूद्र आकुसकर, उद्धवराव इंगोले, सरपंच बालासाहेब ढोले, शिवसेनेचे विकास काशिद, गजानन देशमुख, रमेश ठाकुर, राजाभाऊ देशमुख, वैभव इंगोले, इसाक शेख, गोविंद पाटील, बालासाहेब आकुसकर यांच्यासह आडस परीसरातील शेतकरी उपस्थित होते.