पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 20:11 IST2025-05-19T20:11:12+5:302025-05-19T20:11:47+5:30
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे
अंबाजोगाई : जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीच देत फिरायचं का? असा सवाल करीत ही गुंडगिरी निर्माण झालेलं विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही. त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी जरांगे पाटील यांनी शिवराज याची भेट घेतली. शिवराजच्या अंगावरील बेदम मारहाण केलेले व्रण पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जिवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले. मात्र, लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला.
पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
शिवराज दिवटे हल्ला प्रकरणात पाच जणांना संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी अटक करून परळी न्यायालयात हजर केले. त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा अल्पवयीन मुलांना बीडच्या बाल न्यायालयात हजर करून त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी संभाजीनगर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले.
सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू
मी भेट देणार आहे. आमची दहशत कमी झालेली नाही, हे दाखविण्यासाठी अशी मारहाण केली आहे. संतोष देशमुख यांचा तर बळी घेतलाच, पण हादेखील पार्ट टू होण्यापासून वाचला. सोमवारी डीपीसीच्या बैठकीआधीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू. दिवटे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीच आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश द्यावेत.
- सुरेश धस, आमदार, आष्टी
प्रशासनाचा वचक राहिला नाही
वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या लोकांच्या बदल्या झाल्याशिवाय परळीतील गुंडगिरी कमी होणार नाही. तसेच एसपी लेव्हलची स्वतंत्र व्यक्ती परळी व परिसरासाठी आवश्यक आहे, तरच येथील गुंडगिरी कमी होईल. सत्तेच्या जिवावर गुंडगिरी व मस्ती सुरूच आहे. कायद्याचा धाक नसल्याने व्हिडीओ व्हायरल करून मारहाण केली जाते. या गुंडगिरीवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.
- बजरंग साेनवणे, खासदार बीड