उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:41 IST2018-04-02T00:22:13+5:302018-04-02T11:41:09+5:30
अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.

उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी लाडेवडगाव तर पाच दिवसांपूर्वी सोनहिवरा परिसरात बिबट्या दिसल्याची बाब समोर आली. वर्षभरापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातही खुद्द वनाधिकाऱ्यांनी बिबट्या पाहिला होता. त्या बिबट्याचे छायाचित्रही घेण्यात आले. अंबाजोगाई, परळी, धारूर, आडस या परिसरात वनविभागाचे मोठे जंगल आहे. या जंगलात बिबट्या, तरस व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्गनिर्मित अन्नसाखळीमध्ये प्रत्येक जीव परस्परांवर अवलंबून असतो. मात्र, या अन्नसाखळीत बाधा येऊ लागल्याने जंगलातील प्राणी इतरत्र आसरा घेऊ लागले आहेत. जंगले राहिली तर अन्नसाखळी पूर्ववत सुरू राहिल व त्या प्राण्याचा त्रास गावांना उद्भवणार नाही. गेल्या आठवडयात दिसलेला बिबट्या फक्त इकडून तिकडे पळताना दिसला. त्याने कुठेही हल्ला केला नाही अथवा तो मानवी वस्तीकडे फिरकलाही नाही. रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते खाद्य. सध्या उसाच्या वाढत्या फडांमुळे रानडुक्करांची संख्या वाढली आहे. जंगलातली रानडुकरे उसाच्या फडात आली. आपल्या शिकारीच्या शोधात बिबट्याही उसाच्या फडाचा आश्रय घेऊ लागला आहे. त्यामुळे त्याचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे.
प्राणीगणनेत बिबट्यांची संख्या समोर येईल
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनविभागाच्या वतीने प्राणी गणना केली जाते. या गणनेत जंगलात कोणते प्राणी किती आहेत याची नोंद घेतली जाते. गेल्यावर्षी झालेल्या नोंदीत बिबट्या दिसला मात्र गणनेच्या वेळी तो इतर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यामुळे त्याची नोंद झाली नाही. यावर्षीच्या प्राणी गणनेत अशी नोंद पुन्हा होईल असेही वरवडे म्हणाले.
बिबट्याला घाबरू नका - वन विभाग
बिबट्या हा प्राणी सहसा मनुष्यावर हल्ला करीत नाही. त्याचा पाठलाग करू नका अथवा छेडू नका. उलट बिबट्याचा शेतकºयांना फायदाच होईल. हरीण, रानडुक्कर शेतींची नासधूस करणाºया प्राण्यांना आळा बसेल. जर बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याची नुकसानभरपाई शासनाच्या वतीने दिली जाते. मात्र, असा बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधल्यास त्याचा बंदोबस्त केला जातो, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी दिली.