अंबाजोगाईत हॉर्न वाजवण्यावरून वाद, गुंडांचा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, हॉटेलची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:18 IST2026-03-10T12:18:40+5:302026-03-10T12:18:56+5:30

अंबाजोगाईत व्यावसायिकावर हल्ला करून हॉटेलची तोडफोड करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Goons rampage in Ambajogai! Argument over honking a car horn, assault on businessman, vandalism of hotel | अंबाजोगाईत हॉर्न वाजवण्यावरून वाद, गुंडांचा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, हॉटेलची तोडफोड

अंबाजोगाईत हॉर्न वाजवण्यावरून वाद, गुंडांचा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, हॉटेलची तोडफोड

अंबाजोगाई : रस्त्यावर गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून शहरातील हॉटेल व्यावसायिक अविनाश परशुरामजी मेहता यांच्यावर रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी मोंढा भागातील मुख्य रस्त्यावर घडली. मारहाणीनंतर गुंडांनी मेहता यांच्या हॉटेल मेवाड बिस्ट्रो येथे जाऊन तोडफोड केली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी राहुल भारत इदगले याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अविनाश मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता ते दुचाकीवरून घरून हॉटेलकडे जात होते. शहरातील मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरात पाचवेळा हॉर्न दिला. हा प्रकार पाहून मेहता यांनी बाजूला गाडी थांबवली. कारमधील राहुल भारत इदगले आणि एका पवार आडनावाच्या व्यक्तीने त्यांना खाली उतरून शिवीगाळ केली. रस्ता असताना कार का आडवी लावली? अशी विचारणा करताच आरोपींनी मेहता यांना रॉड आणि काठीने डोक्यावर, हातावर, पाठीवर पायावर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या प्रतीक गुत्तेदार या तरुणालाही त्यांनी धक्काबुक्की केली. मारहाणीनंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मेहता यांना अनिकेत देशपांडे आणि अफ्रोज पठाण यांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मेवाड बिस्ट्रो हॉटेलची केली तोडफोड
मारहाणीच्या घटनेनंतर मेहता यांचे मेवाड बिस्ट्रो हॉटेलवर गेलेल्या राहुल इदगले, पवार आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी रॉडने खुर्च्या आणि काउंटरची तोडफोड करत २० हजार रुपयांचे नुकसान केले. "जर पोलिस ठाण्यात तक्रार केली तर जिवे मारून टाकू," अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली आणि मेहता यांचा मोबाइल घेऊन पसार झाले. याप्रकरणी मेहता यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लक्ष्मणराव घुगे करत आहेत.

Web Title : अंबाजोगाई: हॉर्न विवाद में गुंडों ने व्यवसायी पर हमला किया, होटल में तोड़फोड़ की।

Web Summary : अंबाजोगाई में हॉर्न बजाने को लेकर विवाद में गुंडों ने होटल व्यवसायी अविनाश मेहता पर जानलेवा हमला किया और उनके होटल में तोड़फोड़ की। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Ambejogai: Horn dispute escalates, goons attack businessman, vandalize hotel.

Web Summary : In Ambejogai, a horn dispute led to a brutal attack on hotelier Avinash Mehta. Assailants vandalized his hotel, causing significant damage and issuing death threats. Police are investigating.