सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:58 IST2025-05-30T15:56:31+5:302025-05-30T15:58:00+5:30

माजी मंत्री धनंजय मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडांमुळे अडचणीत; मंत्रिपदही गेले

Good luck to everyone! MLA Dhananjay Munde at Vipassana Center in Igatpuri for peace of mind | सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात मन:शांतीसाठी आठवड्यापासून ध्यानधारणा करीत असल्याचे समोर आले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा सहभाग आढळण्यासह देशमुखांच्या हत्येचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. त्याच्यावर मकोकाही लागला. या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल हाेताच देशमुखांना मारहाण करतानाचे संतापजनक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट करीत आजारपणाचे कारण दिले होते. त्यानंतर करुणा शर्मा यांनीही त्यांच्यावर आरोप केले व या प्रकरणात न्यायालयाने त्यांना पोटगी देण्याचेही आदेश दिले होते. त्यातच त्यांना बेल्स पालसी हा दुर्मीळ आजारही झाला. ते आता कोणालाही न सांगता इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मन:शांतीसाठी दाखल झाले आहेत. आठवड्यापासून ते तेथेच असून, आणखी दोन दिवस राहणार असल्याचे सांगण्यात आले.

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली. एवढेच नव्हे तर मुंडे यांच्याकडील खातेही भुजबळ यांच्याकडेच देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमुळेच त्यांनी मन:शांतीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे का चर्चेत?
दोन दिवसांपूर्वी माजलगावचे माजी आमदार आणि परळी तालुक्यातील मोहा येथील रहिवासी आर. टी. देशमुख यांचे लातूर जिल्ह्यात अपघाती निधन झाले होते. त्यानंतर लगेच मंत्री पंकजा मुंडे यांनी धाव घेतली. अंत्यसंस्कारालाही त्या हजर होत्या; परंतु माजी मंत्री धनंजय मुंडे कोठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या आणि ते विपश्यना केंद्रात असल्याचे समोर आले.

Web Title: Good luck to everyone! MLA Dhananjay Munde at Vipassana Center in Igatpuri for peace of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.