गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:51 IST2025-08-27T18:50:18+5:302025-08-27T18:51:15+5:30

पोलिसांनी शहरात येण्यास प्रतिबंध करणारी नोटीस बजावली होती. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रा. हाके आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात दाखल झाले.

Gevrai Rada; Crime against 14 people including Laxman Haake; Accused of creating law and order problem | गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

गेवराई (जि. बीड) : शहरात ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यातील वादाने गंभीर स्वरूप धारण केले. या दोन्ही गटांत दगडफेक आणि चप्पलफेक झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्रा. हाके यांच्यासह १४ जणांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

प्रा. लक्ष्मण हाके हे सोमवारी गेवराई येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना शहरात येण्यास प्रतिबंध करणारी नोटीस बजावली होती. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रा. हाके आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रा. हाके यांना पुढील प्रवासासाठी निघून जाण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या सुनील ढाकणे नावाच्या व्यक्तीने आपल्या पायातील चप्पल जमावाच्या दिशेने फेकली. या घटनेमुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बळीराम खटके यांनीही जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार समर्थकांनी प्रा. हाके यांच्या दिशेने दगड आणि चप्पला फेकल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवले.

पोलिसांनी प्रा. हाके यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेनंतर, पोलिस कर्मचारी रामराव आघाव यांच्या फिर्यादीनुसार गेवराई पोलिस ठाण्यात प्रा. लक्ष्मण हाके, सुनील ढाकणे, बजरंग सानप, बळीराम खटके, पवन कारवार, सिध्दू पघळ, मुक्ताराम आव्हाड, शिवाजी गवारे, दत्ता दाभाडे, अशोक बोरकर, वसीम फारुखी, शाहरुख पठाण, संतोष सुतार, मोईन खाजा शेख या १४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश कोटकर करत आहेत.

Web Title: Gevrai Rada; Crime against 14 people including Laxman Haake; Accused of creating law and order problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.