'नोकरी लावून देतो, २० हजार पाठवा'; नोकरी डॉट कॉमच्या नावाने इंजिनिअर तरुणीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 16:06 IST2021-12-06T16:02:00+5:302021-12-06T16:06:06+5:30
Crime In Beed : जॉब दिला जाणार असल्याचे सांगून नोंदणी शुल्काच्या नावाखाली बनावट संकेतस्थळाची लिंक पाठवून २० हजार रुपये फसवणूक

'नोकरी लावून देतो, २० हजार पाठवा'; नोकरी डॉट कॉमच्या नावाने इंजिनिअर तरुणीची फसवणूक
बीड : नोकरी डॉट कॉम संकेतस्थळाच्या नावाखाली दोन भामट्यांनी एका अभियंता तरुणीला २० हजार रुपयांना गंडा घातला (cyber crime in Beed ). ही घटना ४ डिसेंबर रोजी शहरातील शाहूनगरात समोर आली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात दोघांवर गुन्हा नाेंद झाला. नीलम बालाजी भावठाणकर (२५,रा.सम्राट चौक, शाहूनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या अभियंता तरुणीचे नाव आहे.
नीलमला २३ रोजी दुपारी ४ वाजून ७ मिनिटांनी एक कॉल आला. नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगून समोरुन बोलणाऱ्या जया नामक महिलेने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर अजय गुप्ता याने कॉल करुन आमच्या कंपनीकडून तुम्हाला जॉब दिला जाणार असल्याचे सांगून नोंदणी शुल्काच्या नावाखाली बनावट संकेतस्थळाची लिंक पाठवून २० हजार रुपये भरण्यास सांगितले. नीलमने पैसे जमा केल्यानंतर नियुक्तीपत्र आलेच नाही.
मोबाइल बंद, संपर्क होईना
ज्या क्रमांकांवरुन भामट्यांचे कॉल आले ते दोन्ही मोबाइल क्रमांक बंद येऊ लागले. फसवणूक झाल्याचे नीलम भावठाणकरच्या लक्षात आले. तिने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन जया व अजय गुप्ता या दोघांवर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे करत आहेत.