वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:31 IST2025-04-22T13:30:42+5:302025-04-22T13:31:03+5:30
कराड खुनाच्या गुन्ह्यात अगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस का लावले? हा प्रश्न आहे.

वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ
बीड : वाल्मीक कराड याची २०१४ पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे. तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झाले आहे. कराड हा गुंड असल्याचे माहिती असतानाही बीड पोलिसांकडून दोन कर्मचारी देऊन कराडलाच संरक्षण देत होते, हे उघड झाले आहे. गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलिस नव्या वादात सापडले आहेत.
सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना गोल्डे यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी जबाब दिला होता. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला सीआयडीने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ जानेवारी रोजी कराड समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला. त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर केले. यावेळी काही लोकांनी हातात दगड घेत गोंधळ घातला होता. परंतु आपण परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा गोल्डेंनी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता, असे गाेल्डे यांनी जबाबात म्हटले आहे.
कराडच्या सुरक्षेसाठी बीड पोलिस तैनात
कराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवले. परंतु त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात पोलिस मुख्यालयातील १८ अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी ठेवले होते. तसेच २२ जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना ६ अधिकारी, ३३ पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते, असे गोल्डे यांनी म्हटले आहे.
गोल्डेंच्या या वाक्याने संभ्रम वाढला
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. याच गुन्ह्यात वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतु तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. साधारण १५ दिवसानंतर कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केले होते. गोल्डे यांच्या या जबाबामुळे संभ्रम आणि नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कराड खुनाच्या गुन्ह्यात अगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस का लावले? हा प्रश्न आहे.