१० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:30 IST2025-08-11T16:24:48+5:302025-08-11T16:30:02+5:30

कोट्यवधींची फसवणूक उघडकीस येणार ?

Fraud of lakhs by promising 10 percent return; Case registered against 11 people from Pune company | १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा

१० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा

कडा (जि. बीड) : दरमहा ८ ते १० टक्के परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून पुणे येथील इनफिनाईट बीकॉन फायनान्शियल सर्विस प्रा. लि. कंपनीकडून गुंतवणूकदाराला गंडा घातल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात ११ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात आष्टीतील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे येथील इनफिनाईट बीकॉन फायनान्शियल सर्विस प्रा. लि. कर्वे नगर पुणे या कंपनीकडून आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणुकीवर दरमहा ८ ते १० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सविस्तर माहिती देत गुंतवणूक करण्याबाबत प्रोत्साहन दिले. त्यामुळे आष्टी तालुक्यातील पारोडी येथील शेतकरी रोहिदास पोपट काळे यांनी कंपनीमध्ये ३ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांनी आरोपींच्या नमूद असलेल्या सीसपे व ट्रेडज् इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या ब्रोकिंग फर्म कंपनीच्या खात्यावर वर्ग केले. तसेच रोहिदास काळे यांच्या ओळखीच्या ५०० ते ६०० व्यक्तींनीदेखील नमूद कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मार्च २०२५ पासून कंपनीने काळे व इतर गुंतवणूकदारांना दरमहा देत असलेला परतावा बंद केला. त्यामुळे त्यांनी कंपनीकडे त्यांचे पैसे मागितले असता कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली व गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले नाहीत.

त्यामुळे आपली व इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने रोहिदास पोपट काळे (वय ४६, व्यक्साय शेती, रा. पारोडी ता. आष्टी) यांनी अंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, संचालक गौरव सुखदेवे, डेजीग्रेटेड डायरेक्टर प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन घर, ययात मिश्रा तसेच नवनाथ जगन्नाथ औताडे, शुभम नवनाथ औताडे, सुवर्णा नवनाथ औताडे, ओंकार भुसारे यांच्यावर ३१६(२),३१६(४),३१६(५)३१८ (४), ६१ (२) भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) सह कलम महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२५ च्या पूर्वी आयएफ ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड या पाेर्टलवर हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे करीत आहेत.

Web Title: Fraud of lakhs by promising 10 percent return; Case registered against 11 people from Pune company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.