वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 18:14 IST2019-11-07T18:13:25+5:302019-11-07T18:14:14+5:30
बीड-नगर रोडवर झालेल्या अपघातात एक वनमजूर गंभीर जखमी

वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार
कडा : रोपवन क्षेत्राची पाहणी करून परतणाऱ्या दोन वनमजुराच्या दुचाकीला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वनमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक वनमजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही अपघात बुधवारी दुपारी वटणवाडी येथे बीड-नगर रोडवर झाला असून बाळासाहेब किसन खुळपे असे मृत वनमजुराचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील रहिवासी असलेले बाळासाहेब खुळपे हे आष्टी येथील वनविभागात वनमजुर म्हणून नोकरीला होते. बुधवारी सकाळी ते सहकारी गौतम विश्वबंर टेकाळे यांना सोबत घेऊन नांदा येथील रोपवन क्षेत्राची पाहणीसाठी गेले होते. पाहणीनंतर दुपारी दुचाकीवरून (एम. एच. 16, ए.एन. 9562) दोघेही कार्यालयाकडे परतत होते. दरम्यान, आष्टीवरून नगरकडे जाणार्या एका भरधाव चारचाकीने (एम. एच. 15, जी. आर. 0531) वटणवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात दोन्ही वनमजूर गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले. मात्र गुरूवारी पहाटे बाळासाहेब खुळपे ( 54) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वनमजूर गौतम टेकाळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. आष्टी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक मनोजकुमार खंडागळे करीत आहेत.