बीडच्या युवासेनेत चार स्कॉर्पिओ गिफ्टवरून जुंपली? दोन्ही मराठवाडा निरीक्षकांत पत्रकबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:54 IST2025-05-27T12:53:58+5:302025-05-27T12:54:16+5:30
युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी निष्ठावंत चार युवा सैनिकांना स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. याची चावी मंत्री सिरसाट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली.

बीडच्या युवासेनेत चार स्कॉर्पिओ गिफ्टवरून जुंपली? दोन्ही मराठवाडा निरीक्षकांत पत्रकबाजी
बीड : दोन दिवसांपूर्वी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून बीडमधील चार निष्ठावंत युवा सैनिकांना मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. त्यानंतर काही तासांत याविरोधात दुसरे मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांनी पत्रक काढले. हे चार युवासैनिक पदाधिकारी आहेत का, असा सवाल उपस्थित केला. हा केवळ नेत्याला खूश करण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा आरोपही पिंगळे यांनी केला. यावर चव्हाण यांनी अशा आरोपांवर बोलणार नाही. पण, मी चार वाटल्या तर तुम्ही १० वाटा, असे प्रत्युत्तर दिले.
बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी तिरंगा रॅली काढण्यात आली. यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर दुपारच्या वेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी निष्ठावंत चार युवा सैनिकांना स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. याची चावी मंत्री सिरसाट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. याचे पत्रक निघताच चव्हाण यांचेच सहकारी असलेले मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. हे सर्व चव्हाण यांचेच नातेवाईक असल्याचा आरोप करीत केवळ नेत्याला खूश करण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून युवासेना पदाधिकाऱ्यांमध्येच आता जुंपल्याचे दिसत आहे.
यापूर्वीही अनेकदा वाद
विधानसभा निवडणुकीपूर्वीदेखील शिवसेना आणि युवासेना यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर बीड शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात मेळावा झाला होता, त्यावेळी युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी एकत्र राहून काम करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही दिवस एकजूट दिसली. पण, आतून धुसफुस सुरूच होती. आतादेखील युवासेनेतच वाद सुरू झाला आहे. तर बाजीराव चव्हाण यांनीही पक्षातीलच सिनियर लीडर यामागे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना-युवासेना असा अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
पाय ओढण्याचे काम
मला या आरोपावर काही बोलायचे नाही. परंतु, मी जर चार वाटल्या असतील तर तुम्ही १० द्या. काम करणाऱ्यांना कशाला मागे ओढता? आम्ही पक्ष वाढविण्यासाठी काम करतो. माझं काम वरिष्ठांना, सर्वांना माहिती आहे. ज्यांनी हे पत्रक काढले, त्यांच्यामागे कोणीतरी पक्षातीलच सिनियर आहे. परंतु, त्यांनीही हे करताना विचार करायला हवा होता. पाय ओढण्याचे काम करू नये.
- बाजीराव चव्हाण, मराठवाडा निरीक्षक, युवासेना
नेत्यांना खूश करण्यासाठी खटाटोप
बाजीराव चव्हाण यांनी ज्या चार युवासैनिकांना स्कॉर्पिओ गिफ्ट केल्या, ते खरोखरच पदाधिकारी आहेत का, हा प्रश्न आहे. ते त्यांचे नातेवाईक, जवळचे कर्मचारी आहेत. पण, तरुण आणि नेत्यांना खूश करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला आहे.
- विपुल पिंगळे, मराठवाडा निरीक्षक, युवासेना