कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:50 IST2025-07-01T16:41:40+5:302025-07-01T16:50:01+5:30
चौथा आरोपी रत्नाकर शिंदे फरार : पोलिस तपास अद्यापही सुरू

कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख
केज : तालुक्यातील उमरी शिवारात चालणाऱ्या महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रावर कलेच्या नावाखाली इतर जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या प्रकरणात तपासानंतर आरोपींच्या यादीत उद्धवसेनाचा तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याचे नाव चौथा आरोपी म्हणून घेतले आहे.
बीड येथील पोलिस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पथकासह केज तालुक्यातील उमरी शिवारातील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र परिसरात सापळा लावून व बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. या ग्राहकाने काम झाल्याचा इशारा करताच पथकाने छापा मारून कला केंद्राच्या मॅनेजरला बनावट ग्राहकाने दिलेल्या पाच हजार रुपयांसह जेरबंद केले होते.
सपोनि. मधुसूदन घुगे यांच्या फिर्यादीवरून सत्त्वशीला बाबासाहेब अंधारे (वय ४३), आदित्य सत्त्वशीला अंधारे (वय २२, दोघी रा. स्वरसंगम कॉलनी, बीड ह मु. सावंतवाडी ता केज) व मयूर बाबूराव अंधारे (वय ३५, रा. उदयनगर, धारूर) या तिघांविरुद्ध केज पोलिसांत २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गुन्हा नोंद झाला होता.
पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी तपास केल्यानंतर त्यांनी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याचे नाव चौथा आरोपी म्हणून घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, रत्नाकर शिंदे अद्याप फरार असल्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही, अशी माहिती तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
यांनी केली होती कारवाई..
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाचे सपोनि मधुसूदन घुगे, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलिस नाईक बहिरवाळ, शिंदे, शुभम घुले, महिला पोलिस अर्चना वंजारे, भाग्यश्री खांडेकर यांनी केली होती.
दहा महिलांची केली होती सुटका..
कारवाई करणाऱ्या पथकाने या कला केंद्रावर कला सादर करण्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दहा पीडित महिलांची सुटका केली होती. यावेळी निरोधचे १४ पाकिटे जप्त केली.