बीडच्या माजी सरपंचाचा अन् व्यापाऱ्याचा तामिळनाडूत बनावट नोटांचा खेळ; मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:25 IST2026-01-30T19:23:55+5:302026-01-30T19:25:13+5:30

केज ते तामिळनाडू बनावट नोटांच्या रॅकेट मागे आणखी कोण? माजी सरपंचासह व्यापारी तामिळनाडूच्या पोलिसांच्या जाळ्यात, सीआयडी करणार पुढील तपास

Former Beed Sarpanch and businessman involved in counterfeit currency game in Tamil Nadu; Large stock seized | बीडच्या माजी सरपंचाचा अन् व्यापाऱ्याचा तामिळनाडूत बनावट नोटांचा खेळ; मोठा साठा जप्त

बीडच्या माजी सरपंचाचा अन् व्यापाऱ्याचा तामिळनाडूत बनावट नोटांचा खेळ; मोठा साठा जप्त

- मधुकर सिरसट
केज (बीड) :
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा धाडसी पण बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांनाही तब्बल ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.

पेट्रोल पंपावरील त्या '२००' रुपयांनी घातला घात
केज येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खाजगी कारने (MH 44 Z 2383) तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी पेट्रोल पंपावर २०० रुपयांच्या काही नोटा दिल्या. तेथून ते निघून गेल्यावर कर्मचाऱ्याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरून संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचून ही कार अडवली.

कारमध्ये नोटांचे ४१ बंडल! 
पोलिसांनी कारची झडती घेतली असता अधिकारीही चक्रावून गेले. कारमध्ये २०० रुपयांच्या नोटांचे तब्बल ४१ बंडल दडवून ठेवलेले होते. एकूण ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूर्वीच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.

कनेक्शन कोणाचे? 
या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : बीड के पूर्व सरपंच, व्यवसायी तमिलनाडु में नकली नोटों के साथ गिरफ्तार।

Web Summary : बीड के पूर्व सरपंच और व्यवसायी तमिलनाडु में 8.37 लाख रुपये के नकली नोटों के साथ गिरफ्तार। उन्होंने कई शहरों में नोट चलाने की बात कबूली। जांच जारी है।

Web Title : Beed ex-Sarpanch, businessman caught with fake notes in Tamil Nadu.

Web Summary : Ex-Sarpanch and businessman from Beed arrested in Tamil Nadu with ₹8.37 lakh in counterfeit currency. They confessed to circulating notes in multiple cities. Investigation ongoing.