बीडच्या नाथापूरमध्ये हवेत गोळीबार, गावठी पिस्तुलासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:07 IST2025-03-18T16:28:47+5:302025-03-18T20:07:41+5:30
या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीडच्या नाथापूरमध्ये हवेत गोळीबार, गावठी पिस्तुलासह तिघांना अटक
बीड : तालुक्यातील नाथापूर येथे धुलिवंदनाच्या दिवशी काही व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, गोळीबार केलेल्या काडतुसाची पुंगळी जप्त केली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
१४ मार्च रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान कोणीतरी हवेत गोळीबार केल्याची माहिती पिंपळनेर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुसुदन यांना १५ मार्च रोजी मिळाली होती. याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत यांना देऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम, पोह. राहुल, कैलास, मनोज व पिंपळनेर पोलिस ठाण्याचे अंमलदार अविनाश यांनी नाथापूर येथे जाऊन गोपनीय माहिती मिळविली. १४ मार्च रोजी रवी राधेश्याम वक्ते याच्या शेतात जेवणाची पार्टी होती. त्यावेळी त्याने साथीदाराकडील गावठी पिस्तुलामधून हवेत गोळीबार केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून पथकाने संशयित अजय अण्णासाहेब साबळे (रा. शिदोड) , रवी राधेश्याम वक्ते, महादेव सर्जेराव चव्हाण यांना ताब्यात घेत चौकशी केली. यात रवी वक्ते याने अजय साबळे याच्याकडील गावठी पिस्तुलामधून एक राउंड फायर केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल अजय साबळे याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दोन पंचांना बोलावून शिदोड येथे अजय साबळे याच्या घरातून ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तूल व आरोपींनी गोळीबार केलेल्या काडतुसाची रिकामी पुंगळी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी तिघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम, भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक नवनीत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन, उपविभागीय अधिकारी विश्वंभर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.