धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:19 IST2025-08-02T17:18:06+5:302025-08-02T17:19:28+5:30
शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शिस्तीवर आता गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत.

धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
धारूर (बीड) : धारूर शहरातील नावाजलेल्या सरस्वती प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास शाळेतील शिक्षक विजय काळे आणि लिपिक प्रदीप शेटे यांच्यात वादावादीतून थेट तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, किरकोळ वादातून सुरू झालेला हा वाद क्षणात विकोपाला गेला. हाणामारीनंतर लिपिकाने आपल्या नातेवाईकांना शाळेत बोलावले. त्यांनीही शिक्षकाला शाळेच्या परिसरात मारहाण केली. दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने शाळेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शाळेतील वातावरण अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून, अशा घटना वारंवार घडत असल्याची चर्चा होत आहे. शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शिस्तीवर आता गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे केंद्रप्रमुख सय्यद हाकीम यांनी आज, 2 ऑगस्ट रोजी शाळेला भेट देऊन सविस्तर चौकशी केली. मुख्याध्यापकास तातडीने अहवाल तयार करून शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.