प्रयोगशील शेतकऱ्याचे मनोधैर्य उध्वस्त डाळींब बागेने तोडले; स्वतःच्या शेतातच घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:26 IST2018-08-18T17:23:22+5:302018-08-18T17:26:40+5:30
डाळींब बागेवर पडलेला रोग आणि डोक्यावरील कर्ज याने खचलेल्या पारनेर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्रयोगशील शेतकऱ्याचे मनोधैर्य उध्वस्त डाळींब बागेने तोडले; स्वतःच्या शेतातच घेतला गळफास
पाटोदा (बीड ) : डाळींब बागेवर पडलेला रोग आणि डोक्यावरील कर्ज याने खचलेल्या पारनेर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भीमराव भाऊसाहेब सगळे (५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना कृषी विभागाने प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी असा पुरस्कार देण्यात आला होता.
पारनेर येथे भीमराव यांना एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या नावे पावणेपाच एकर जमीन होती. ते शेतातच कुटुंबासह रहात होते. गावात त्यांनी पहिल्यांदा "नेट -शेड " शेतीचा प्रयोग केला. शिवाय त्यांनी शेतात डाळींब बाग लावली होती. यातील ठिबक सिंचनासाठी कर्ज काढले होते. तसेच त्यांच्या नावे पिककर्ज होते. त्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, उडीद, तीळ ही पिकं कोमेजलेली होती.यातच डाळींब बागेवर रोग पडला यामुळे भीमराव हताश झाले होते. याच विवंचनेत त्यांनी आज सकाळी डाळींब बागेच्या शेजारीच झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मार्च ते ऑगस्ट या पाच महिन्यांत तालुक्यात भीमराव सगळे यांच्यासह १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.