A family returning from marriage meet an accident near the Vadwani; Three killed | लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या कुटुंबाचा वडवणीजवळ अपघात; तिघे ठार
लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या कुटुंबाचा वडवणीजवळ अपघात; तिघे ठार

ठळक मुद्देभरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली.यामध्ये सर्वच जण उडून रस्त्यावर फेकले गेले.

बीड/वडवणी : नातेवाईकाचे लग्न लावून दुचाकीवरून परतताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दाम्पत्यासह त्यांची एक मुलगी जागीच ठार झाली. तर चार वर्षाचा चिमुकला यातून बचावला आहे. हा अपघात वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्याजवळ बीड-परळी हायवेवर घडला. मयत सर्व पाथरी (जि.परभणी) तालुक्यातील रहिवाशी आहेत.

नंदकुमार उर्फ गणेश कैलास राठोड (२८), रोशन गणेश राठोड (११) व शोभा गणेश राठोड (२५ सर्व  रा.सुंदरनगर तांडा ता.पाथरी) अशी मयतांची नावे आहेत. तर रोहन गणेश राठोड (४) हा अपघातातून सुदैवाने बचावला आहे. गणेश राठोड हे आपल्या दुचाकीवरून (एमएच २० एएन ९१७) उपळी (ता.वडवणी) येथे लग्नासाठी आले होते. दुपारचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते सर्व दुचाकीवरून पुन्हा गावी परतत होते. याच दरम्यान ब्रम्हनाथ तांड्याजवळ एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सर्वच जण उडून रस्त्यावर फेकले गेले. गणेश, शोभा आणि रोशन या तिघांच्याही डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर रोहन हा गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील लोकांनी तात्काळ वाहनातून माजलगावला उपचारासाठी हलविले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वडवणी ठाण्याचे सपोनि सुरेश खाडे, मनोज जोगदंड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रूग्णवाहिकेतून कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आहेत. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. नातेवाईकांना माहिती दिली असून काही नातेवाईक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याचे समजते.

हेल्मेट वापरण्याची गरज
दुचाकीवर प्रवास करताना पोलिसांकडून वारंवार हेल्मेट वापरण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. मात्र, वाहनधारकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. या अपघातातही केवळ डोक्याला मार लागल्यानेच तिघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. महामार्ग पोलिसांकडून याबाबत जनजागृती सुरू असल्याचे पोउपनि भास्कर नवले यांनी सांगितले.


Web Title: A family returning from marriage meet an accident near the Vadwani; Three killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.