'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तोतया अधिकाऱ्याला जालन्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:06 IST2026-03-11T16:45:42+5:302026-03-11T17:06:35+5:30
दारूच्या व्यसनासाठी महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तोतया अधिकाऱ्याला जालन्यातून अटक
कुसळंब : 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विविध लोकांच्या मोबाईल स्कॅनरचा वापर करून महिलांकडून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला अंमळनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर (वय ३५, रा. नाळवंडी, ता. पाटोदा) असे या भामट्याचे नाव असून, दारूच्या व्यसनापोटी त्याने ही नामी शक्कल लढवल्याचे तपासात समोर आले आहे.
पाटोदा तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागात आरोपी पन्हाळकर हा स्वतःची ओळख 'समाजकल्याण विभागाचा जाधव साहेब' अशी करून देत असे. "तुम्हाला शिलाई मशीन, पिठाची गिरणी आणि भांड्यांचे किट मंजूर झाले आहे," अशी बतावणी करून तो ट्रान्सपोर्ट खर्चाच्या नावाखाली महिलांकडून अडीच हजार रुपये उकळत होता. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून तो स्वतःच्या खात्यात पैसे न घेता, हॉटेल, पान टपरी किंवा महा-ई-सेवा केंद्रांच्या स्कॅनरचा वापर करून पैसे मागून घेत असे.
अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळवंडी येथील कविता पवार आणि इतर चार महिलांना अशाच प्रकारे फसवून त्याने ९ हजार रुपये उकळले होते. किट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कविता पवार यांनी १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ, योगेश बहिरवाळ, दिलीप घोशीर, पूजा तिपटे आणि शीतल पवळ यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील तपासात पोउपनि चव्हाण व त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण मदत केली.
सिम कार्ड बदलून मोबाईल बंद-चालू
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी २५ ते ३० मोबाईल क्रमांकांचे सीडीआर तपासले. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलून मोबाईल बंद-चालू करत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक होते. मात्र, तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी ९ मार्च रोजी जालना शहरातून त्याला ताब्यात घेतले.
दारूच्या नशेसाठी रचला कट
आरोपी पन्हाळकर हा पाचवी नापास आहे. त्याला दारूचे तीव्र व्यसन असल्याने पैशांची गरज होती. बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर तो सहज महिलांच्या पतींना फोन लावायचा आणि "किट मंजूर झाले आहे, तातडीने पैसे पाठवा" असे सांगून हॉटेलच्याच स्कॅनरद्वारे पैसे उकळायचा.