उंदरखेल तलावात ६० वर्षीय व्यक्तीचा सांगाडा आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:29 IST2023-04-06T13:28:23+5:302023-04-06T13:29:20+5:30
सांगाडा कोणाचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही; अंभोरा पोलिसांचा तपास सुरु आहे

उंदरखेल तलावात ६० वर्षीय व्यक्तीचा सांगाडा आढळल्याने खळबळ
- नितीन कांबळे
कडा (बीड): उंदरखेल तलावातील दगडी पिचिंगमधील झाडाझुडपात अडकलेला सांगाडा आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा सांगाडा पुरुष जातीचा असल्याची माहिती आहे. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
आज सकाळी आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात काहीजण मासेमारी करत होते. यावेळी त्यांना तलावाच्या बाजूस दगडांमधील झाडाझुडपात एक सांगाडा असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. प्राथमिक माहिती नुसार, हा सांगाडा पुरुष जातीचा असून अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष असेल. फक्त सांगडा असल्याने पंचनामा करून मृतदेह अंबाजोगाई येथे अधिक तपासासाठी पाठविण्यात आला आहे. सांगाडा कोणाचा आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. दरम्यान, घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अंमलदार अमोल शिरसाठ यांनी भेट दिली.