रेल्वे धावल्याने बीडकरांत उत्साह; ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:12 IST2025-09-18T12:11:25+5:302025-09-18T12:12:50+5:30
बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

रेल्वे धावल्याने बीडकरांत उत्साह; ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांचा संघर्ष
बीड : बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला रेल्वे प्रकल्प ५० वर्षांनंतर पूर्णत्वास जात आहे. बीड ते अहिल्यानगर असे १६६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर डेमू रेल्वेही धावली. यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आंदोलने केली, तुरुंगातही गेले होते. पण आता बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवसभर रेल्वे स्थानकावर बीडकरांची गर्दी दिसून आली. अजूनही बीड ते परळी या मार्गाचे काम अपूर्ण आहे.
बीडला रेल्वे यावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. दिवंगत माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक नेते आणि रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर १९९५ साली अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गासाठी तांत्रिक मान्यता मिळाली. तेव्हा ३३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता, पण कामाचा खर्च वाढत गेल्याने तो आता ४ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधी वितरित केल्याने मंगळवारी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर पहिल्यांदाच डेमू रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी हिरवा झेंडी दाखवून ही रेल्वे मार्गस्थ केली. अजूनही बीड ते परळी आणि बीड ते छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव या मार्गासाठी लोकप्रतिनिधी आणि बीडकरांचा लढा सुरूच आहे.
५० टक्के वाटा न दिल्याने प्रकल्प रखडले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रेल्वे प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी देणार नाही, असा निर्णय मागील सरकारने घेतल्यामुळे राज्यातील सर्वच रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारचा नामोल्लेख न करता केली. मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी २१ हजार कोटी रुपये दिले. त्याआधीच्या सरकारने दहा वर्षांत केवळ ४५० कोटी रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला. आजचा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा आहे. हा जगन्नाथाचा रथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओढणाऱ्या सर्वांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला.
मुंबईसाठी रेल्वे पुण्यापर्यंत जोडणार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज बीडकरांची रेल्वेची स्वप्नपूर्ती होत आहे. सध्या डेमू रेल्वे सुरू झाली आहे. महिनाभरात इलेक्ट्रिकचे काम सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बीड-अहिल्यानगर प्रवासाचा वेळ कमी होईल. मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे पुण्यापर्यंत नेणार आहे." बीडमध्ये रेल्वेच नव्हे, तर विमानतळ लवकरच होईल, असेही ते म्हणाले. तसेच, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत देण्यासाठी तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
बीड-अहिल्यानगर रेल्वेची ठळक आकडेवारी
मार्गाची एकूण लांबी : २६१.२५ किलोमीटर (अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्ग)
निधी : ४८०५.१७ कोटी
डेमू रेल्वे (बीड ते अहिल्यानगर)
सुटण्याची वेळ (अहिल्यानगरहून) : सकाळी ६:५५ वाजता
पोहोचण्याची वेळ (बीड येथे) : दुपारी १२:३० वाजता
सुटण्याची वेळ (बीडहून) : दुपारी १:०० वाजता
पोहोचण्याची वेळ (अहिल्यानगर येथे) : सायंकाळी ६:३० वाजता
तिकीट दर : ४० रुपये
थांबे : एकूण १३
पूर्ण झालेले काम : अहिल्यानगर ते बीड
बाकी असलेले काम : बीड ते परळी वैजनाथ