केज तालुक्यात शिक्षिकेच्या आत्महत्येने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:46 IST2019-02-22T13:44:19+5:302019-02-22T13:46:04+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

केज तालुक्यात शिक्षिकेच्या आत्महत्येने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
केज : तालुक्यातील जवळबन येथील वस्तीशाळेवरील शिक्षिका राजश्री व्यंकट मुंडे (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
राजश्री मुंडे या कवडगाव येथील रहिवासी असून त्या सध्या जवळबन येथील वस्तीशाळेवर कार्यरत होत्या. गुरुवारी सायंकाळपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकानी सर्वत्र शोधाशोध केली असता बोरी सावरगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडास राजश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले अशी माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री उशिरा त्यांनी गळफास घेतला असावा असा संशय आहे.
युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, राजश्री मुंडे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. विद्यार्थीप्रिय शिक्षिकेच्या आत्महत्येमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.