बीड : ॲनेमियामुक्त भारत करण्यासाठी शासनाकडून जनजागृती केली जात असतानाच पात्रूड आरोग्य केंद्रात अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ ऐवजी शेंगा व गुळ गरोदर महिलांना देण्यात आला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत महिलांना ही अनोखी भेट दिली.
प्रत्येक महिन्याच्या ९ तारेखला सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर महिलांची स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाते. शनिवारीही माजलगाव तालुक्यातील पात्रूड आरोग्य केंद्रात ही तपासणी करण्यात आली. परंतु, यावेळी महिलांची केवळ तपासणीच न करता त्यांना संक्रांतीच्या निमित्ताने अनोखी भेटही देण्यात आली. संक्रांतीला लोक तिळगुळाची देवाणघेवाण करतात. परंतु, येथे सर्व महिलांना शेंगा व गुळ भेट देण्यात आला. यामुळे महिलांचे आरोग्य सदृढ राहण्यासह ॲनेमियामुक्त भारत होण्यासाठी मदत होईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. याज्ञिक रणखांब, डॉ.राहुल कोकाटे, स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. मयूरी डक, मनोज वाघमारे, बी. जे. ठोंबरे, वर्षा पवार, संगीता वाघचौरे, पूनम खंदारे, अशोक मुंडे, उज्ज्वला मिसाळ, प्रमिला तगारे, सुमित्रा आवाड, कल्पना पवार, कीर्ती व्यवहारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.