बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:28 IST2019-02-21T12:25:00+5:302019-02-21T12:28:28+5:30

विहिरीच्या कडेला चप्पल आणि त्या सोबत एक चिठ्ठी आढळून आली

Due to the sister's suicide, the youth jumped in the well | बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी

बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी

केज (जि. बीड) : औरंगाबाद येथे चुलत बहिणीने तिच्या मुलीला गळफास देऊन स्वत: आत्महत्या केल्याचे समजल्यावर बेपत्ता झालेल्या तालुक्यातील बोबडेवाडी येथील तरुणाचा परिसरातील विहिरीत मृतदेह आढळून आला. 

तालुक्यातील बोबडेवाडी येथील ज्ञानेश्वर विठ्ठल बोबडे (२३) १७ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता. या बाबत त्याच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार केज पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होती. २० फेब्रुवारी रोजी बोबडेवाडी शिवारातील लंगर पट्टा भागात एका शेतातील विहिरीच्या कडेला चप्पल आणि त्या सोबत एक चिठ्ठी शेळ्या सांभाळणाऱ्या एका व्यक्तीला आढळून आली. या बाबत पोलिसांना माहिती देऊन विहिरीत पोहणारांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

औरंगाबाद येथील बेगमपुरा भागात राहणारी ज्ञानेश्वरची चुलत बहीण अमृता किशोर मुळे (२२) हिने तिच्या वाढदिवशी तीन वर्षांची मुलगी स्वरा हिस गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचा धक्का सहन न झाल्याने तेव्हापासून ज्ञानेश्वर घरातून बेपत्ता झाला होता. बुधवारी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. धनपाल लोखंडे, पो. कॉ. श्रीराम चेवले हे करीत आहेत.

वाचवू शकलो नाही म्हणून...
ज्ञानेश्वरने आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीच्या काठावर काढलेल्या चपलेजवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने ‘ मी माझ्या बहिणीला व भाचीला वाचवू शकलो नाही, त्यामुळे आत्महत्या करीत आहे’ असा उल्लेख केलेला आहे.

Web Title: Due to the sister's suicide, the youth jumped in the well