कोरोनामुळे रेशीम कोषाचा भाव २५० रूपयांवर घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST2021-04-01T04:34:26+5:302021-04-01T04:34:26+5:30
संजय खाकरे परळी : कोरोनाच्या भीतीमुळे रेशीम विक्रीसाठी बंगळुरू व अन्य मार्केटमध्ये जाता येईना. त्यामुळे परळीतच नीचांकी दराने ...

कोरोनामुळे रेशीम कोषाचा भाव २५० रूपयांवर घसरला
संजय खाकरे
परळी : कोरोनाच्या भीतीमुळे रेशीम विक्रीसाठी बंगळुरू व अन्य मार्केटमध्ये जाता येईना. त्यामुळे परळीतच नीचांकी दराने रेशीम कोष विकावा लागत असल्याची कैफियत पांगरी व लिंबोटा येथील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी ‘लोकमत’कडे मांडली.
पांगरी येथील रेशीम उत्पादक शेतकरी वसंत सोपानराव मुंडे म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा बंद झाली आणि यंदा पुन्हा कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पसरला असल्याने बंगळुरू येथे रेशीम मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी जाता आले नाही. एकीकडे कोरोनाचा फटका बसलेला असतानाच उजी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे वसंत मुंडे, मनोहर मुंडे यांनी सांगितले.
शासनाच्या रेशीमविषयक नवीन धोरणामुळे मागच्या काही वर्षांपासून तालुक्यात बरेच शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित झाले. रेशीम कोषाला भावही चांगला मिळू लागला. त्यातच लॉकडाऊनचा परिणाम रेशीम प्रक्रिया उद्योगावर होत आहे. त्यामुळे रेशीम कोषाचे दरही कमी झाले आहेत. ४५० ते ६०० रूपये किलोचा मिळणारा दर आता २०० ते २५० रूपयांवर आल्याची माहिती लिंबोटा येथील रेशीम उत्पादक शेतकरी विश्वनाथ मुंडे व राहुल मुंडे यांनी दिली. त्यातच महावितरणने थकीत वीजबिलांमुळे वीजपुरवठा खंडित केला होता ते पूर्ववत करण्यासाठी जवळ पैसा नसतानाही उसनवार करून वीजबिले भरावी लागली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे रेशीम व्यवसायाला फटका बसला असून, अडचणीत सापडलेल्या पांगरी येथील रेशीम उत्पादकांना परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांनी शेडसाठी अनुदान मिळवून दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उजी माशीच्या प्रादुर्भावामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ही माशी रेशीम आळ्यांना चावते. त्यामुळे अळ्या मरतात. कोषावर चावलेल्या ठिकाणी काळा डागही पडतो. परिणामी दर कमी मिळतो व उत्पन्नात घट होते. या माशांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतून पूर्ण शेडला मच्छरदाणीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खर्चातही वाढ होत आहे.