दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:53 IST2025-05-17T02:52:53+5:302025-05-17T02:53:19+5:30

नागरिकांनी वाहन पेटवले, चालक ताब्यात; सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता.

drunk unconscious container driver runs over 20 citizens along with vehicle thrilling incident in beed | दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्क, लोखंडी सावरगाव (जि. बीड): जिल्ह्यातील मस्साजोग ते लोखंडी सावरगावदरम्यान दारूच्या नशेत बेभान असलेल्या चालकाने भरधाव वेगाने कंटेनर नेत आठ ते दहा वाहनांना आणि नागरिकांना उडविल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघात मालिकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, एका पोलिस कर्मचाऱ्यासह २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात मीना प्रवीण घोडके (३७, रा. टाकळी) यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी पाठलाग करून पलटी झालेला कंटेनर पेटवून दिला.

युसूफ सय्यद (६२, रा. पंचवटीनगर, लातूर), असे दारुड्या चालकाचे नाव आहे. फ्रीज व टिफिन डबे असलेला कंटेनर घेऊन युसूफ अंबाजोगाईकडे निघाला होता. त्याने मांजरसुंबा येथील एका ढाब्यावर दारू ढोसली. नंतर तो नशेतच कंटेनर घेऊन निघाला. केज तालुक्यातील मस्साजोग येथे गेल्यानंतर धुंदीत एका वाहनधारकाला त्याने कट मारला आणि भरधाव निघून गेला.

नागरिकांनी भरधाव कंटेनरचा केला पाठलाग

केज येथील शिक्षक कॉलनी, जुने पोलिस स्टेशन, बसस्थानक परिसरात कंटेनरने काही वाहनांना व नागरिकांना धडक दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी केज येथून कंटेनरचा पाठलाग केला. साडेचार वाजेच्या सुमारास हा कंटेनर लोखंडी सावरगावजवळील कळंब फाटा येथे आला. 

यावेळी वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर अंबाजोगाईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जाऊन भिडला आणि पलटी झाला. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या लोकांनी चालकाला पकडले. नागरिकांनी कंटेनर पेटवून दिला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी चालक युसूफला ताब्यात घेतले.

सुमारे अर्धा तास सुरू हाेता थरार 

कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर युसूफने उलट कंटेनर अधिक वेगाने पळवला. या कंटेनरने समोर आलेल्या अनेक वाहनांना धडक देऊन चिरडले. केज, चंदणसावरगाव, होळ परिसरातील अनेक नागरिकांनाही धडक देऊन जखमी केले. सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता.

 

Web Title: drunk unconscious container driver runs over 20 citizens along with vehicle thrilling incident in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात