'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:36 IST2025-09-25T18:35:48+5:302025-09-25T18:36:16+5:30
'काळजी करू नका, मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी; हतबल शेतकऱ्यास धीर देत धनंजय मुंडेंनी दिला शब्द

'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!
परळी (बीड) : अतिवृष्टी व पुरामुळे परळी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या तेलसमुख, बोरखेड, ममदापूर गावांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
तेलसमुख येथील एका शेतकरी महिलेचे कापसाचे पूर्ण पीक नासल्याने तिच्या मुलीच्या लग्नाबाबत ती हतबल झाली होती. त्यांना धीर देत मुंडे म्हणाले, “अक्का, लग्न दिवाळीत ठरल्याप्रमाणेच होईल, सर्व जबाबदारी मी घेतो.” यावेळी त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना १००% नुकसानभरपाई मिळेल यासाठी काटेकोर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
ममदापूर येथील ३८ वर्षीय तरुण शिवराज कदम हा पुराच्या पाण्यात दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री कौडगाव हुडा येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत झाला होता, त्या तरुणाच्या कुटुंबीयांना यावेळी प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, युवक नेते अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, भागवत कदम, बालासाहेब कदम, वसंत राठोड, भगवान पौळ, जानीमिया कुरेशी यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.