बीड : उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या विरोधात अपात्रतेचा ठराव बुधवारी झालेल्या बीड नगर पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला तर दुसरीकडे गटनेते फारूक पटेल यांच्या प्रस्तावावरून खान खाँ सभागृहासंदर्भात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड पालिकेत पुन्हा एकदा राजकारण शिजू लागले आहे.
उपनगराध्यक्षांच्या विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव भीमराव वाघचौरे यांनी मांडला. अनुमोदन नगरसेवक प्रभाकर पोपळे, विकास जोगदंड यांनी दिले. बहुमताने अन्य नगरसेवकांनी सहमती दर्शविली व ठराव बहुमताने मंजूर झाला. सभागृहात पालिकेच्या संचिका हिसकावून घेणाऱ्या शेख वकील अहेमद व उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक कुलदीप घोडके या दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा ठरावही घेण्यात आला. बीड नगरपालिकेचे सहाय्यक रचनाकार आशुतोष कावलकर व रचना सहाय्यक अंकुश लिंबके यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळणे बाबतची संचिका बळजबरीने हिसकावून घेतल्याबद्दल या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे एकमत झाले
बुधवारी बीड नगर पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शहरातील भाजी मंडई येथील अहिल्याबाई होळकर सभागृह महिला बचत गटाला भाडेतत्वावर देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई- निविदेस मान्यता देण्यात आली तर विशेष रस्ता अनुदान २०१६-१७ अंतर्गत बीड शहरातील विकास कामांना मान्यता देण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण योजना २०१६-१७ अंतर्गत भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील हिंदू स्मशानभूमी विकसित करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. २०२१-२२ करिता भांडार विभागांतर्गत विविध विषयाबाबत ई- निविदा प्रसिद्ध करून दरपत्रक मागविणेस मान्यता, नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता लिखाण साहित्य खरेदी, चारचाकी वाहने किरायाने लावणे,, नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता छपाई साहित्य खरेदीस मान्यता देण्यात आली.
खान खाँ सभागृहासाठी बीड नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील झमझम कॉलनी येथे जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पूर्ण शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने गटनेते फारुख पटेल यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या अभिनंदनाचा ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला आणि तो मंजूर झाला.