पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:38 IST2024-12-16T11:37:27+5:302024-12-16T11:38:08+5:30
परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे

पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री
बीड : नव्या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली. यामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले परंतु, एकाच कुटुंबातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहीण - भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.
राज्यातील राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली होती. भाजपच्या पंकजा मुंडे यांना लाेकसभेत उमेदवारी दिली. परंतु, त्यांना यात अपयश आले. त्यानंतरही त्यांना विधानपरिषदेत संधी देण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीत परळीतून विक्रमी मतांनी धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळला. पंकजा या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, तर धनंजय मुंडे हेदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या टॉपच्या नेत्यांमध्ये आहेत. त्यामुळे या दोघांच्या नावांची मंत्रिपदासाठी जास्त चर्चा होती. परंतु, अजित पवार गटाचे माजलगावचे आ. प्रकाश सोळंके आणि आष्टीतील भाजपचे आ. सुरेश धस यांनीदेखील मंत्रिपदासाठी जाेर लावला होता. परंतु, अखेर मुंडे बहीण - भावाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, या दोघांनीही रविवारी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली.
धनंजय तिसऱ्यांदा, तर पंकजा दुसऱ्यांदा मंत्री
धनंजय मुंडे हे तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०१९मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीत असताना त्यांनी सामाजिक न्याय विभाग, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीत कृषिमंत्री पद सांभाळले होते. आता तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी २०१४ ते २०१९ या काळात ग्रामविकास खाते सांभाळलेले आहे. त्या आता दुसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत.
बहीण-भाऊ एकत्र आल्याने बळ
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात परळी मतदारसंघात थेट लढत झाली होती. यात धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळत मंत्रिपद मिळवले होते. परंतु, नंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे पंकजा आणि धनंजय हे बहीण - भाऊ एकत्र आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही एकमेकांचा प्रचार केला होता. आता दोघांनाही मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याला बळ मिळाले असून, विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
बीड जिल्ह्यातील आतापर्यंतचे मंत्री
जिल्ह्यात आतापर्यंत १४ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे, दिवंगत विमल मुंदडा, दिवंगत सुंदरराव सोळंके, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, सुरेश धस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बाजीराव जगताप, प्रकाश सोळंके, शिवाजीराव पंडित, बदामराव पंडित, अशोक पाटील, पंडितराव दौंड यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.